कोरोनाचे नियम पाळत रथाचे घेतले दर्शन,
प्रतिनिधी/ पुसेगाव
महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील प पू श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सवाचा कार्यक्रम यात्रेचे धार्मिक विधी पूर्वापार प्रथेनुसार आणि रूढी व परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळत भाविकांना रथाचे दर्शन घेता आल्याने भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले. श्री सेवागिरी महाराज की जयच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
पहाटे महाराजांच्या संजीवन समाधी वर पारंपरिक धार्मिक विधी, मंत्रपुष्पांजली पूजा कार्यक्रम मठाधिपती, पुजारी व विश्वस्त यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर श्री सेवागिरी महारांचा फोटो व पादुका रथात ठेवण्यात आल्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे, नितीन बानुगडे- पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रथपूजन करण्यात आले.
याप्रसंगी मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, प्रांताधिकारी जनार्दन कासार, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी गणेश बोबडे व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचा दिवस. या दिवशी सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेला, फुलांनी सजविलेला व नोटांच्या माळांनी फुललेला रथ गावातून फिरविण्यात येतो. संपूर्ण गावातून रथाच्या मिरवणुकीचा कार्यक्रम असतो. मात्र, यंदा रथ मिरवणूकच रद्द केल्यामुळे रथपूजनाचा कार्यक्रम मंदिर परिसरातच पार पडला. दिवसभर भाविकांनी रथाचे मनोभावे दर्शन घेत मोठय़ा भक्तीभावाने नोटांच्या माळा रथावर अर्पण केल्या व रांगा लावून समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
दरम्यान, रथ व समाधी दर्शनास भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला होता. तसेच पुसेगाव शहर, मंदिरास जोडले गेलेले सर्व रस्ते तसेच छ. शिवाजी चौकात बॅरिगेट्स लावून पोलीस प्रशासनाने बंद केल्याने वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला. यावर्षी प्रथमच यात्रा कालावधीत म्हसवड नगरपरिषदचा अग्निग्नशमन बंब आणण्यात आला होता.
गेल्या 74 वर्षे यात्रा सुरू झाल्यापासून सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेला, फुलांनी सजविलेला रथाच्या मिरवणुकीची परंपरा चालत आली आहे. मात्र, सलग दुसऱया वर्षीही कोरोनाच्या साथीमुळे रथ मिरवणुकीसह यात्रेतही खंड पडला आहे.