तामिळनाडूचे दांपत्य हॅरी पॉटर थीममध्ये करणार रिसेप्शन
वधूच्या दिवंगत वडिलांचा अवतारही होईल सामील
कोरोना संकटामुळे तामिळनाडूतील एका दांपत्याने नव्या युक्तीद्वारे वेडिंग रिसेप्शनची योजना आखली आहे. तामिळनाडूत भारतातील पहिला मेटावर्स विवाह होणार असून यात असंख्य पाहुणे सामील होऊ शकतील. मेटावर्स विवाहसोहळा 6 फेब्रुवारीला होईल. दिनेश एसपी आणि जनगानंदिनी रामास्वामी फेब्रुवारीतील पहिल्या रविवारी तामिळनाडूच्या शिवलिंगपुरम गावात स्वतःचा विवाह करतील, परंतु त्यांचे रिसेप्शन डिजिटल माध्यमातून होणार आहे.
पहिला मेटावर्स विवाह
सोहळय़ानंतर दांपत्य स्वतःच्या हॉगवर्ट्स थीमयुक्त रिसेप्शनसाठी व्हर्च्युअल व्हेन्यू त प्रवेश करण्यासाठी स्वतःच्या लॅपटॉवर ऑनलाइन असतील आणि त्यांचे मित्र तसेच कुटुंबीय यात सामील होतील. या कार्यक्रमात मुलीचे दिवंगत वडिल आभासी अवतारात (3डी व्हर्च्युअल अवतार) रिसेप्शनचे यजमान असतील. ही मेटावसंमध्ये आफ्टर लाइफची एक नवी पद्धत असेल. भारतात पहिल्यांदाच मेटावर्सचा एक बहारदार सोहळा असेल असे दिनेशने म्हटले आहे.
महामारीमुळे सुचली कल्पना
वधू जनगानंदिनी ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आणि दिनेश आयआयटी मद्रासमध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून काम करतो. क्रिप्टो आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाशी जोडलेला असून त्यावरच काम करतो. ब्लॉक चेन मेटावर्सचे मूलभूत तंत्रज्ञान आहे. अशा स्थितीत विवाह ठरल्यावर मेटावर्समध्ये रिसेप्शन ठेवण्याची कल्पना सुचली. आभासी जगाच्या विचारामागे ब्लॉक चेनचा सिद्धांतच काम करतो असे दिनेशने सांगितले.
हॉगवार्ट किल्ल्याची थीम
वधू आणि वर हे हॅरी पॉटरचे फॅन आहेत. याचमुळे हॉगवार्टच्या किल्ल्यावर रिसेप्शनची थीम ठेवण्यात आली आहे. नातेवाईकांना यात सामील होण्यासाठी लिंक आणि पासवर्ड देण्यात आले असून यातून ते स्वतःचे अवतार निवडतील. सर्व अवतार परस्परांना भेटून संभाषण करू शकतील. तसेच भेटवस्तू किंवा व्हाएचर गुगलपेद्वारे दिले जातील. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे येथे भोजनाची मेजवानी नसेल.