वृत्तसंस्था/ क्विन्सटाऊन
यजमान न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतावर सलग दुसरा विजय मिळवित 2-0 अशी आघाडी मिळविली. मंगळवारी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने भारतावर एक षटक बाकी ठेवून तीन गडय़ांनी विजय मिळविला. या मालकेतील तिसरा सामना शुक्रवारी खेळविला जात आहे. मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघाला अनुभवी झुलन गोस्वामीची उणीव भासली.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत 6 बाद 270 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडने 49 षटकांत 7 बाद 273 धावा जमवित विजय नोंदविला. न्यूझीलंडच्या अमेलिया केरने शानदार नाबाद शतक झळकविले. कर्णधार मिताली राज आणि रिचा घोश यांची अर्धशतके वाया गेली.
भारताच्या डावामध्ये कर्णधार मिताली राजने 81 चेंडूत नाबाद 66 तर रिचा घोशने 64 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 65 धावा जमविल्या. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 17.4 षटकांत 108 धावांची भागिदारी केली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार मिताली राजने 59 धावा जमविल्या होत्या. मिताली राजने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहताना 66 धावांच्या खेळीत 3 चौकार मारले. मेघनाने 50 चेंडूत 7 चौकारांसह 49 धावा जमविताना शफाली वर्मासमवेत सलामीच्या गडय़ासाठी 61 धावांची भागिदारी केली. शफाली वर्माने 24 धावा जमविल्या. यास्तिका भाटियाने 38 चेंडूत 31 तर उपकर्णधार कौरने 18 चेंडूत 10 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे सोफी डेव्हाईनने 42 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावाला खराब सुरूवात झाली. मात्र शतकवीर केर आणि ग्रीन यांनी चौथ्या गडय़ासाठी 24.4 षटकांत 128 धावांची भागिदारी केली. भाटियाने ग्रीनला 23 धावांवर जीवदान दिले. या जीवदानाचा लाभ घेत तिने 52 धावा जमविल्या. तत्पूर्वी न्यूझीलंड संघाची 9 षटकाअखेर स्थिती 3 बाद 55 अशी होती. डेव्हाईन 33 धावांवर, बेट्स 16 तर कर्णधार सॅथर्टवेट शून्य धावांवर बाद झाली. न्यूझीलंड संघाला 16.3 षटकांत विजयासाठी 88 धावांची जरूरी होती. 40 व्या षटकाअखेर न्यूझीलंडने 5 बाद 213 धावा जमविल्या होत्या. शेवटच्या 10 षटकांत त्यांना विजयासाठी 58 धावांची गरज होती. केरने 132 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 119 धावा जमवित आपल्या संघाला 6 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला. भारताच्या दिप्ती शर्मा 52 धावांत 4 तर पुनम यादव, गायकवाड आणि हरमनप्रित कौर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पुजा वस्त्रका रआणि सिमरन बहादूर यांना एकही गडी बाद करता आला नाही. भारतीय गोलंदाजांना शेवटच्या 10 षटकांत न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखता आले नाही. तसेच भारताचे क्षेत्ररक्षण दर्जेदार न झाल्याने हा सामना गमवावा लागला. अनुभवी झुलन गोस्वामी या सामन्यात खेळू न शकल्याने भारताला तिची गैरहजेरी चांगलीच जाणवली.
मानधना तिसऱया सामन्यात खेळणार (फोटो-15 एसपीओ 04-स्मृती मानधना)
कोरोना समस्येमुळे क्वारंटाईनमध्ये असलेली भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना या मालकेतील शुक्रवारी होणाऱया तिसऱया सामन्यात उपलब्ध राहील. तिचा क्वारंटाईनचा कालावधी संपला आहे. भारतीय संघातील मानधना, रेणुका सिंग आणि मेघना सिंग यांचा क्वारंटाईनचा कालावधी वाढविल्याने त्यांना एकमेव टी-20 सामना आणि दोन वनडे सामन्यांत खेळता आले नाही.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकांत 6 बाद 270 (मिताली राज नाबाद 66, रिचा घोष 65, शफाली वर्मा 24, यास्तिका भाटिया 31, मेघना 49, डेव्हाईन 2-42), न्यूझीलंड 49 षटकांत 7 बाद 273 (ऍमेलीया केर नाबाद 119, ग्रीन 52, डेव्हाईन 33, बेट्स 16, दिप्ती शर्मा 4-52, पुनम यादव, राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रित कौर प्रत्येकी एक बळी).