काँग्रेस पक्षाचा कर्मचाऱयांना पाठिंबा
प्रतिनिधी / मडगाव
3 वर्षांच्या सेवेनंतर नियमितीकरणाची मागणी करणाऱया गोव्यातील 130 तरुणांकडे असंवेदनशील भाजप सरकारने डोळेझाक केली आहे. आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या मध्यस्थीने सदर प्रश्न तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. आयएफबी व्यवस्थापनाशी देखील एक सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी बोलणी करण्याची माझी तयारी आहे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
वेर्णा औद्योगिक वसाहतीत असलेल्या आयएफबी कंपनीच्या संपावर असलेल्या कामगारांची काल गुरूवारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली. त्यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव बोलत होते. शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा, एव्हरसन वालीस, कॅप्टन विरियाटो फर्नांडिस, मोरेनो रेबेलो आदी उपस्थित होते.
भाजप सरकारने काँग्रेसचा जाहीरनामा लागू करावा, ज्यामुळे गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही 500 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे जाहिरनाम्यात वचन दिले होते असे युरी आलेमाव म्हणाले.
बेरोजगारी भत्याचे केवळ आश्वासन
2012 मध्ये बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिलेले भाजप सरकार तीन निवडणुकांनंतरही स्वतःचे निवडणूक आश्वासन पूर्ण करू शकले नाही, हे खेदजनक आहे. आज दहा वर्षांनंतर ते ‘ना बेरोजगारी भत्ता देत आहेत’, ‘ना नोकऱया देत आहेत’, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी भाजप सरकारला इशारा दिला की, गोव्यातील युवकांना डावलून बाहेरील लोकांना नोकऱया देण्याची प्रथा सुरू झाल्यास राज्यात मोठी समस्या निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांनी त्वरित हा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्ष नेहमीच गोमंतकीयांच्या हितासाठी लढला आहे. आम्ही युवकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या हक्कासाठी लढा देऊ, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. काँग्रेस नेते मोरेनो रेबेलो यांनीही संपावर असलेल्या तरुणांना पाठिंबा देण्याचे वचन दिले.