पुणे / वार्ताहर :
Kidnapping of a shopkeeper from a love affair खरेदीचा बहाणा करुन दुकानदाराचे अपहरण करुन त्याला वसईच्या जंगलात सोडणाऱ्या अपहरणकर्त्यांपैकी एकाला हडपसर पोलिसांनी राजस्थानमधील पाली येथून अटक केली आहे.
कैलासराम सोहनलाल जाट (Kailasram Jat) (वय 35, रा. पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तर त्याचे साथीदार तिकाराम खोत, भंवर जाखड, गाविंद (सर्व रा. जालोर, राजस्थान) हे फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे. प्रेमसंबंधातून हे अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
अधिक वाचा : दक्षिण, मध्य, वायव्य भारतात थंडी जास्त
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मांजरी येथे दुकान आहे. 23 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तिघे जण दुकानात आले. खरेदीचा बहाणा करुन त्यांनी मारहाण करत बोलोरो गाडीतून त्यांना पळवून नेले होते. वाटेत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वसई विरार टोलनाक्याजवळील जंगलात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सोडून ते निघून गेले होते. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक तपास केल्यावर त्यातील एक संशयित राजस्थानातील पाली येथे असल्याचे आढळून आले. त्यानंतर तपास पथकाने पाली येथे जाऊन कैलासराम जाट याला पकडले. त्यातून अपहरणामागील कारण स्पष्ट झाले. फिर्यादी यांचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहे. या तरुणीचे नातेवाईक राजस्थानमध्ये राहतात. त्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी केरळ येथून पुण्यात आले. त्यांनी फिर्यादी याचे अपहरण करुन पुढे वसईजवळ सोडून दिले व त्यानंतर ते राजस्थानला निघून गेले होते. यासंदर्भात अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.