मध्यप्रदेशच्या भोपाळ आणि इंदोरमध्ये आयफाचे आयोजन होणार होते. परंतु कोरोना संकटामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला आहे. या सोहळय़ाच्या आयोजनाकरता 700 कोटी रुपये खर्च केले जाणार होते. पण आता हा निधी मुख्यमंत्री सहाय्य निधीत कोविड-19 विरोधी लढय़ासाठी हस्तांतरित करण्यात आला आहे.
राज्यात एका मोठय़ा सोहळय़ाच्या स्वरुपात आयफाची तयारी सुरू होती. सद्यस्थितीत या मेगा इव्हेंटचा निधी मुख्यमंत्री सहाय्यनिधीत वर्ग करण्यात आला आहे. आयफा 2020 चे आयोजन मार्चच्या अखेरीस होणार होते. कोरोना विषाणू तसेच कमलनाथ यांचे सरकार गडगडल्याने हा सोहळा स्थगित करण्यात आला.
मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आढावा बैठकीत कोविड-19 रोखण्याच्या तयारींची माहिती जाणून घेतली आहे. कोरोनाग्रस्त क्षेत्राला हॉटस्पॉट घोषित करत त्याला प्रतिबंधित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच तेथे दूध, औषधे आणि आवश्यक सामग्रीचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे.
18 जिल्हय़ांमध्ये संसर्ग
मध्यप्रदेशात एकूण 52 जिल्हे असून यातील 18 जिल्हय़ांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भोपाळ, इंदोर आणि उज्जैनच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. कुठल्याही प्रकारच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच या भागांमध्ये प्रशासनाकडून आवश्यक सामग्रीचा पुरवठा केला जाणार आहे.
जॅकलिन, सलमानकडून प्रचार
आयफाच्या तारखांची घोषणा करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस भोपाळ येथे पोहोचले होते. दोघांनी तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत इंदोरमध्ये आयफाच्या आयोजनाची घोषणा केली होती. आयफाचे पहिल्यांदाच मुंबईबाहेर आयोजन केले जाणार होते.