26/11 हल्ल्याप्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार : रस्त्याकडेला विषण्ण अवस्थेत आढळला
वृत्तसंस्था/ मुंबई
वयाची 60 ओलांडलेले हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे मुंबई येथील फुटपाथवर विषण्ण अवस्थेत आढळून आले आहेत. एका दुकानदाराने त्यांना अशा अवस्थेत पाहून मदत केली आहे. या वृद्धाची संबंधितांनी अधिक विचारपूस केली असता तो 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला ओळखणारा साक्षीदार असल्याचे समोर आले. तसेच श्रीवर्धनकर यांना या हल्ल्यावेळी गोळय़ाही लागल्या होत्या.
हरिश्चंद्र यांना त्यांच्याच कुटुंबीयांनी घराबाहेर हाकलले आहे. वृद्धत्वाच्या स्थितीत हरिश्चंद्र यांना अन्नाशिवाय रस्त्यावर दिवस काढण्याची वेळ आली आहे. हरिश्चंद्र यांची अवस्था सात रस्ता शॉपचे मालक डिन डिसोझा यांना दिसून आली. त्यांनी श्रीवर्धनकर यांना मदत करत त्यांची माहिती जाणून घेतली.
26/11 हल्ल्यात गोळी लागून देखील श्रीवर्धनकर यांनी स्वतःच्या बॅगद्वारे दहशतवाद्यांवर हल्ला चढविला होता. अजमल कसाब याची ओळख पटविणारे ते महत्त्वाचे साक्षीदार होते. कामा हॉस्पिटल येथे अबू इस्माईल आणि कसाबच्या गोळीबारात ते सापडले होते. श्रीवर्धनकर यांची स्थिती पाहून डिसोझा यांनी आयएमकेअर्स या स्वयंसेवी संस्थेचे संचालक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. तसेच तुटपुंज्या माहितीतून श्रीवर्धनकर यांच्या बंधूंचा शोध लावला आहे. श्रीवर्धनकर यांचे कुटुंबीय त्यांना पुन्हा घरात घेऊ इच्छित नाही. परंतु या असामान्य व्यक्तीच्या मदतीसाठी आम्ही इच्छूक आहोत, असे गायकवाड यांनी म्हटले