प्रतिनिधी/ रत्नागिरी
<जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात दाखल झालेल्या चाकरमान्याचे स्वॅबचे अहवाल हाती येत असून त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबाधीतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळपर्यंत आणखीन 18 जण पॉझिटीव्ह आढळले असून एकूण बाधीतांची संख्या 287 झाली आहे. दरम्यान, कोरोना मुक्तांच्या संख्येनेही शतक पार केल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी सायंकाळपासून जिल्हय़ातील 14 जणांना डिस्चार्ज मिळाला असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 113 झाली आहे.
सोमवारी सकाळपर्यंत पॉझिटीव्ह आलेल्या 18 अहवालामध्ये रत्नागिरी 7, कळंबणी 8, गुहागर 1, राजापूर 2 असे रूग्ण आहेत. रविवारी संध्याकाळी उशीरा एका रूग्णाला घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांच्या संख्येने शतक पूर्ण केले. त्यानंतर सोमवारी कळंबणी येथून आणखी दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्यांची एकुण संख्या 113 झाली आहे. जिल्हय़ात आतापर्यंत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ऍक्टीव्ह रूग्ण 165 आहेत.
खेडमध्ये आणखी 8 रूग्ण
खेडः तालुक्यातील जामगे व चाकाळे येथील कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील प्रत्येकी चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाला. नव्या 8 रूग्णांमुळे आरोग्य यंत्रणेची धावाधाव सुरू झाली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35 वर पोहचली आहे.
जामगे येथील 40 वर्षीय तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबासह संपर्कातील व्यक्तींचे नमुने पाठवण्यात आले होते. रविवारी 12 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असतानाच सोमवारी कुटुंबातीलच चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याचबरोबर चाकाळे येथील 19 वर्षीय कोरोनाबाधित युवकाच्या कुटुंबातील चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. यामध्ये दोन चिमुरडय़ांचाही समावेश आहे. मुंबईतून गावी आलेल्या युवकाचा चार दिवस गावात वावर होता.
राजापूरात आणखी 4 पॉझीटीव्ह
राजापूरः तालुक्यात सोमवारी आणखी चार कोरोना रूग्ण सापडले आहेत. ओणी येथे दोन तर कशेळी व खिणगीणी येथे प्रत्येकी एक रूग्ण सापडला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या 27वर पोहोचली आहे.
खिणगिणी आणि ओणी-तेलीवाडी येथे प्रथमच रूग्ण सापडले आहेत. तर, पूर्वी कंन्टेन्मेंट झोन केलेल्या ओणी-कोंडीवळे व कशेळी येथे दोन रूग्ण सापडले आहेत. या सर्वांचा प्रवास मुंबईसह एकमेकांशी निगडीत आहे. सोमवारी एकाच दिवशी चार रूग्ण सापडल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या सत्तावीस झाली आहे.