मिळकतींची कागदपत्रे सादर न केल्यास दुप्पट कर आकारणार
प्रतिनिधी / कराड
राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्व, पश्चिम बाजूच्या 219 मिळकतधारकांना नगरपरिषदेने दुप्पट कराच्या नोटीसा दिल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत मिळकतधारकांनी आपली कागदपत्रे नगरपरिषदेसमोर सादर न केल्यास संबधित मिळकतधारकांकडून दुप्पट कर आकारणी केली जाणार असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. त्यामुळे मिळकतधारकांची चांगलीच धावपळ उडाली असून यावर बाजू मांडण्यासाठी व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनी महामार्ग व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक संघाची स्थापना केली आहे.
मलकापूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गाच्या निर्मितीत दोन्ही बाजूच्या मिळकतधारकांच्या जमिनी गेल्या आहेत. दरम्यान सध्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मिळकती या सेवारस्त्याला लागून आहेत. यातील 219 मिळकतधारकांना नगरपरिषदेने नोटीस बजावल्या आहेत. अतिक्रमण असल्याने दुप्पट कर आकारणी का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. यावर महामार्ग व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक संघाने नगराध्यक्षा नीलम येडगे व मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासमोर म्हणणे मांडले आहे. नगरपरिषदेने मिळकतधारकांना नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत म्हणणे मांडत कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिळकतधारकांनी आपला बांधकाम परवाना, सातबारा उतारा, फेरफार नगरपरिषदेत सादर करावयाचा आहे. तो सादर न केल्यास त्यांना दुप्पट कराच्या नोटीसा दिल्या जाणार आहेत. तो कर भरणे मिळकतधारकांवर बंधनकारक राहणार आहे. या विषयावर आता मिळकतधारकांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. गुरूवारी मिळकतधारकांची बैठक पार पडली. या बैठकीतही नगरपरिषदेसमोर बाजू मांडण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे.
सत्ताधारी गटाच्या भूमिकेकडे लक्ष महामार्गालगतच्या व्यापारी, व्यावसायिकांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी आपली बाजू मांडली आहे. मात्र काही भागात अतिक्रमण झाल्याचा दावा नगरपरिषदेचा आहे. त्यामुळे आता सत्ताधारी गट नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. व्यापारी व्यावसायिकांनी आपली भूमिका निवेदनाद्वारे मांडली आहे.