आगार प्रशासनाचा निर्णय – शिवसेनेच्या बस फोडीच्या इशाराने निर्णय
वार्ताहर/ निपाणी
बेळगाव येथे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनाला काळे फासले, रुग्णवाहिकेवरती हल्ल्याचा प्रयत्न झाला. या निषेधार्त शुक्रवारी कोल्हापूर येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनांचा निषेध करत कर्नाटक बसेसना काळे फासले. त्याचबरोबर बसेस फोडण्याचा इशाराही दिला. याची दखल घेताना निपाणी आगार प्रशासनाने शनिवारी महाराष्ट्र बससेवा थांबविण्याचा निर्णय घेतला. यामुळे आगारात महाराष्ट्रात जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना त्रास होताना खासगी वाहनांचा पर्याय निवडणे भाग पडले.
निपाणी आगारातून सकाळच्या टप्प्यात महाराष्ट्रात जाणारी कोल्हापूर, सांगली, हुपरी, पुणे, मुंबई अशी बससेवा सुरु होती. पण बेळगाव येथे घडल्याच्या प्रकाराचा निषेध करताना कर्नाटक बससेवेविषयी संताप वाढला. हे लक्षात येताच निपाणी बस आगाराने महाराष्ट्र बससेवा एक दिवसासाठी थांबविली. पुर्व नियोजन करुन महाराष्ट्रात जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांची मात्र या प्रकारातून गैरसोय झाली. महाराष्ट्रातून कर्नाटक बससेवा मात्र सुरुच होती.
फक्त एक दिवसासाठी
सुरक्षेची खबरदारी म्हणून निपाणीतून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई अशा महाराष्ट्रात जाणाऱया बसेस थांबविल्या आहे. इचलकरंज, गडहिंग्लजकडे जाणाऱया बसेस मात्र कांही प्रमाणात सुरु ठेवल्या आहेत. हा निर्णय शनिवार एक दिवसासाठी घेण्यात आला आहे, अशी माहिती निपाणी आगाराचे सनदी यांनी सांगितले.