ऑनलाईन टीम / जयपूर :
पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराला राजस्थानमध्ये महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अखिल अरोरा यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कोरोना संसर्गाच्या परिणामांमुळे म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे राजस्थानात साथ रोग कायदा, 2020 च्या कलम 3 च्या सहकलम 4 अंतर्गत म्युकरमायकोसिसला अधिसूचित रोग म्हणून सूचित केले गेले आहे.
काही दिवसांपूर्वी राजस्थानसह देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आजाराच्या प्रकरणांबद्दल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चिंता व्यक्त केली होती.