जिल्हा पोलीस प्रमुखांचा आदेश
प्रतिनिधी /बेळगाव
यमकनमर्डी पोलीस स्थानकातील आठ पोलिसांची उचलबांगडी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी या संबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. 4 किलो 900 ग्रॅम सोने चोरी प्रकरण गाजत असतानाच या बदल्या झाल्या आहेत.
हवालदार एस. जे. कल्याणपूरकर, हवालदार ए. आर. जुम्माई व व्ही. आर. नायक, एस. वाय. खिलारगी, एच. बी. खरोशी, मंजुनाथ न्हावी, एस. के. हुगार या पोलिसांच्या चिकोडी, ऐगळी, सदलगा, निपाणी शहर, नंदगड व अथणी पोलीस स्थानकात बदल्या करण्यात आल्या आहेत.
एस. के. हुगार हे गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात कार्यरत होते. ओओडीवर यमकनमर्डी पोलीस स्थानकात ते सेवा बजावत होते तर उर्वरित सात जण यमकनमर्डी पोलीस स्थानकात सेवेत होते. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी 15 जून रोजी बदल्यांचा आदेश जारी केला आहे.
गेल्या एक महिन्यांपासून सोने चोरी प्रकरण चांगलेच गाजत आहे. हे प्रकरण सध्या सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे. सीआयडीचे पथक या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. हुबळी येथील किरण वीरनगौडर याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. एक दोन दिवसांत कोठडीची मुदत संपणार आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास, गोकाकचे डीएसपी जावेद इनामदार यांच्यासह चार अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता यमकनमर्डी पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या दोन हवालदारांसह आठ जणांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
हुबळी येथे सीआयडीचे पथक
सीआयडीचे पथक शुक्रवारी हुबळी येथे दाखल झाले आहे. सोने चोरी प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून शनिवारी या पथकातील अधिकारी बेळगावला येण्याची शक्यता आहे.