सेन्सेक्स 344 अंकांनी तेजीत : महिंद्राचे समभाग सर्वाधिक वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील सकारात्मकतेत भारतीय शेअरबाजारही सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजीसमवेत बंद झालेला पहायला मिळाला. बँक निफ्टी निर्देशांकाने विक्रमी झेप घेतल्याचेही पाहायला मिळाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 344 अंकांच्या तेजीसह 62,846 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 99 अंकांच्या वधारासह 18,598 अंकांवर बंद झाला होता. आयटी आणि ऑइल व गॅस सोडल्यास इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले आहेत. धातू निर्देशांक 1 टक्का वधारत बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.4 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.3 टक्के वाढत बंद झाला होता.
तेजीचा सूर सकाळपासूनच्या सत्रात कायम होता आणि अखेरपर्यंत तो राहिला, हे महत्त्वाचे. दरम्यान महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग सर्वाधिक 3.71 टक्के इतके वाढलेले होते. याशिवाय टायटनचे समभाग 2.48 टक्के तेजीसह कार्यरत होते. टाटा स्टील, एसबीआय, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा मोटर्स तसेच लार्सन टुब्रो व अॅक्सिस बँक यांनीही तेजी राखत बाजाराला मजबूत आधार दिला. दुसरीकडे एचसीएल टेक, पॉवरग्रिड कॉर्प, मारुती सुझुकी, विप्रो, टीसीएस, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीसह बंद झालेले पाहायला मिळाले.
पाचव्या स्थानावर
भारतीय शेअरबाजार हा जगातील पाचवा सर्वात मोठा शेअरबाजार ठरला आहे. मागच्या आठवड्यात अदानी ग्रुपच्या बाजार भांडवलात वाढ झाली होती. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात गुंतवणूकीत रस दाखवला आहे. 3.3 ट्रिलीयन डॉलर (272 लाख कोटी रुपये)सह भारतीय शेअरबाजार पाचव्या स्थानावर राहिला आहे.
जागतिक बाजारात पाहता अमेरिकेतील बाजार तेजीत होते. डोव्ह जोन्स 328 अंकांनी तर नॅसडॅक 277 अंकांनी तेजीत होता. युरोपियन बाजारात मात्र चढ उतार पाहायला मिळाला. आशियाई बाजारात तेजी होती. निक्की, कोस्पी, सेट कम्पोझीट, शांघाई कम्पोझीट यांचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले होते.