प्रतिनिधी/ वडूज
पोलीस असल्याचे भासवून नागरिकांचे दागिने, पैसे लुटण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. गुरुवारी दुपारी भरदिवसा अकराच्या सुमारास चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच एका वृद्धास लुटण्याची घटना घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, वाकेश्वर येथील कृष्णा उर्फ किसन विठ्ठल फडतरे हे दहिवडी रस्त्यावरील पवार इलेक्ट्रॉनिक्समध्ये टी. व्ही. दुरुस्तीला देऊन नवीन पोलीस ठाणे इमारतीच्या शॉर्टकट रस्त्यावरून एस. टी. बसस्थानकाच्या बाजूला चालले होते. ते पोलीस ठाण्याजवळ आले असताना पिवळी पॅन्ट असणाऱया एका इसमाने त्यांना तोंडावर मास्क न लावल्याबद्दल हटकले. त्यानंतर काळे मळ्यात चोरी झाली आहे. तुमच्याजवळ काही दागिने, पैसे असले तर आम्हाला दाखवा. आम्ही मुंबईच्या विशेष पोलीस दलातील अधिकारी आहोत अशी बतावणी केली. त्यावर फडतरे यांनी आपल्या हातातील अंदाजे सात व आठ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठय़ा त्या इसमाकडे दिल्या. त्याचवेळी दुचाकीवरून निघालेल्या एकास अडवून त्याच्याही चौकशीचा बहाणा करत संबधिताने त्याच्याकडून काही ऐवज काढून घेतला. त्यानंतर हातचलाखी करत एका कागदाची पुडी बांधून हे घ्या तुमचे दागिने खिशात घालून ठेवा असे फडतरे यांना सांगितले.
त्यांनतर काही वेळाने फडतरे घरी जाऊन जेवण करण्याअगोदर कागदाची पुडी सोडून पाहतायत तर त्यामध्ये दोन लहान दगड आढळून आले. त्यानंतर जेवण न करताच फडतरे यांनी रिक्षा करून पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी कार्यरत असणाया अंमलदारानी चला तुमचे म्हणणे साहेबांना सांगा असे म्हणून अधिकाऱयांसमोर घडल्या प्रकारची तोंडी माहिती घेऊन एखादा संशयित सापडला तर तुम्हांस कळवतो असे सांगून फडतरे यांची समजूत काढली.
वृध्द फडतरे हे माजी सैनिक आहेत. त्यांना मुलगा नाही. सर्व मुली सासरी गेल्या आहेत. अशा निराधार वृद्धाची चोरी झाली आहे. मागील आठवडय़ात हिंगणे रस्त्यावर बटाटा व्यापारी व सोसायटीचे माजी उपाध्यक्ष प्रकाश बनकर, शिवाजीनगर येथील जेष्ठ वृद्धा लीलावती रामचंद्र गोडसे यांचेही दागिने अज्ञात चोरटय़ांनी हातोहात लांबवले आहेत. तर मागील महिन्यात वाकेश्वर येथील माजी सैनिक तानाजी निवृत्ती राऊत यांच्या रोख रकमेची चोरी पुसेगाव रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेनजीक भरदिवसा झाली होती. दिवसा ढवळ्या होणाऱया चोऱयाने जेष्ठ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.