बिल थकविल्याने हेस्कॉमकडून विद्युतपुरवठा खंडित
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डने पथदिपांचे बिल भरले नसल्याने हेस्कॉमने पुन्हा पथदिपांचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून कॅन्टोन्मेंट परिसरातील बत्ती गुल झाली असून नागरिकांना पुन्हा अंधारातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. चार कोटींचे विद्युतबिल थकल्याने हेस्कॉमने विद्युतपुरवठा बंद केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डने पथदिपांचे बिल नियमितपणे भरले नसल्याने 4 कोटी थकले आहेत. तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱया विद्युतपंपाचे 63 लाखांचे विद्युतबिलही कॅन्टोन्मेंट बोर्डने भरले नाही. त्यामुळे विद्युतबिल भरण्यासाठी हेस्कॉमकडून कॅन्टोन्मेंटला वेळोवेळी सूचना करण्यात आली होती. तरीदेखील थकीत बिलाची रक्कम भरली नाही. त्यामुळे विद्युतपुरवठा बंद करण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली. यापूर्वी 3 कोटी बिल थकले असताना हेस्कॉमने विद्युतपुरवठा खंडित केला होता. विद्युतबिल भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. यापूर्वीदेखील दीड ते दोन महिने कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदिपांचा विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तर जिल्हाधिकाऱयांकडे तसेच आमदारांकडे पाठपुरावा केल्यानंतर विद्युतपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र थकीत बिलाची रक्कम अद्यापही भरली नसल्याने मंगळवारपासून कॅन्टोन्मेंट परिसरातील पथदीप पुन्हा बंद झाले आहेत.
कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने पावसाचे पाणी साचत आहे. अशातच आता रस्त्यावरील पथदीप बंद ठेवण्यात आल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. खड्डेमय रस्त्यांवरून अंधारात चाचपडत जाण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डने तातडीने बिलाची रक्कम अदा करून पथदीप सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.