प्रतिनिधी / सातारा :
वाई तालुक्यातील बोपेगाव येथील युवकास एका महिलेने व्हॉट्सऍपवरुन अश्लिल चॅटिंग करुन ते त्याच्या कुटुंबातील लोकांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत तब्बल 2 लाख 89 हजार रुपये उकळले. आखणी दोन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जितेंद्र सोपान जाधव (वय 30, रा. बोपेगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो शिवशक्ती सहकारी पतसंस्थेत नोकरी करतो. त्याला हेमंत मोरे (रा. कुडाळ, ता. जावली) व एका महिलेने संगनमत करुन त्याच्याशी व्हॉट्सऍपवर अश्लिल चॅटिंग केले. त्यानंतर ते चॅटिंग जाधव याच्या कुटुंबातील लोकांना व पतसंस्थेतील लोकांना दाखवून तुझी बदनामी करतो अशी धमकी दिली. जाधव याच्याकडून धनश्री हॉटेल शहाबाग, आधार हॉस्पिटलच्या समोर आदी ठिकाणी बोलवून घेवून 2 लाख 89 हजार 500 रुपये घेतले. तसेच अजून दोन लाख रुपये दे म्हणून सतत पैशाचा तगादा लावला. पैसे न दिल्यास जीवे मारिन अशी धमकी दिली. जाधव याने वाई पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे हे करत आहेत.