प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्र सरकारने गेल्यावर्षी काही चिनी ऍपवर बंदी घातली होती. दोन देशांमधील संबंध ताणले गेल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. आता लोकांची फसवणूक करून ब्लॅकमेल करणाऱया चिनी लोन ऍपच्या कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. या कारवाईत 17 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे चालविण्यात येणाऱया चिनी लोन ऍप कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
बेंगळूरच्या एच.एस.आर. लेआऊट, कोरमंगलसह 7 ठिकाणी ईडीने छापे टाकले. जनतेतून मोठय़ा प्रमाणात तक्रारी दाखल झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. रेजर पे प्रा. लि., पॅश फ्री पेमेंट्स, पेटीएम पेमेंट सर्व्हिस लि. आणि इतर चिनी व्यक्तींकडून नियंत्रित केल्या जाणाऱया लोन ऍप कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कंपन्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईट, नोंदणीकृत पत्त्यांवर कामकाज करीत नसल्याचे ईडीच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.
अलीकडे लोन देण्याच्या आमिषाने दुप्पट वसुली करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी बेंगळूरमध्ये दाखल झाल्या आहेत. बेंगळूरच्या सायबर गुन्हे पोलीस स्थानकात 18 एफआयआर दाखल करण्यात आले होते. कर्जाची परतफेड केल्यानंतर देखील या ऍप आधारित लोन देणाऱया कंपन्यांकडून पिळवणूक थांबत नव्हती. त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सायबर गुन्हे विभागाकडे धाव घेतली होती. त्यानुसार शनिवारी शहरात 7 ठिकाणी छापे टाकून पीएमएलए ऍक्टअंतर्गत चिनी लोन ऍप कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बँक खाती गोठविली
भारतीयांच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून चीनमधील अनेक कंपन्यांनी लोन ऍप तयार केले होते. चिनी कंपन्या बोगस संचालकांची नेमणूक करून लोन ऍपचे संचालन करत होते. याची माहिती मिळताच धाडी टाकून या ऍप कंपन्यांची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून बँक खाती गोठविण्यात आली आहेत.