तामिळनाडूच्या राज्यपालांविरोधात पोस्टर्स झळकली ः मुख्यमंत्र्यांचे आमदारांना आवाहन
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूत सत्तारुढ द्रमुक आणि राजभवनामधील संघर्ष वाढतच चालला आहे. राज्यपालांचा विधानसभेतून सभात्याग तसेच तामिळनाडू विरुद्ध तमिझगम वादात राज्यपाल आर. एन. रवी यांच्या टिप्पणींमुळे द्रमुक आमदार चांगलेच नाराज झाले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या विरोधात राज्यात अनेक ठिकाणी पोस्टर्स झळकली आहेत. याचबरोबर राज्यपालाच्या पोंगल निमंत्रणपत्रिकेत तामिळनाडू सरकारऐवजी ‘थमिजहागा अजुनार’ असा उल्लेख आहे. राजभवनच्या पोंगल सोहळय़ाच्या निमंत्रणपत्रिकेवर कथित स्वरुपात राज्य सरकारचे प्रतीक चिन्ह नसल्याने वाद अधिकच वाढला आहे. तमिळ भाषेतील निमंत्रणपत्रिकेवर केवळ राष्ट्रीय प्रतीक असल्याचे म्हणत यावर टीका केली जात आहे.
तर दुसरीकडे द्रमुक अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मंगळवारी स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना विधानसभा अधिवेशनादरम्यान राज्यपालांना उद्देशून कुठलीच अपमानास्पद टिप्पणी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्यपालांच्या विरोधात पोस्टर्स झळकवू नयेत अशी सूचना त्यांनी केली आहे.
पूर्ण देशासाठी लागू असलेल्या गोष्टीला तामिळनाडू नकार देतो, राज्य सरकारला आता याची सवयच होऊन बसली आहे. तमिझगम हे नाव राज्यासाठी अधिक उपयुक्त आहे. देशाच्या उर्वरित हिस्स्यांनी दीर्घकाळापर्यंत विदेशी आक्रमकांकडून नुकसान झेलले आहे. तामिळनाडूचा अर्थ ‘तमिळांचे राष्ट्र’ असा होतो, तर तमिझगमचा अर्थ ‘तमिळ लोकांचे निवासस्थान’ आहे आणि हे या क्षेत्राचे प्राचीन नाव असल्याचे राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले होते.
द्रमुककडून राज्यपालांवर आरोप
राज्यपाल आर. एन. रवी हे भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठी तमिझगम नावाचा वापर करत असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. वस्तुस्थितीच्या स्वरुपात चुकीची आणि संभाव्य स्वरुपात धोकादायक वक्तव्ये राज्यपाल करत असल्याचा दावा द्रमुक नेते टी. आर. बालू यांनी केला आहे.
राज्यपालांकडून सभात्याग
राज्यपाल रवी यांच्यावर विधानसभेतील अभिभाषणात काही मुद्दे वगळल्याचा आरोप राज्य सरकारने केला होता. यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हा बदल फेटाळण्यासाठी एक प्रस्ताव मांडल्यावर राज्यपालांनी सभात्याग केला होता. भाजपने राज्यपाल रवी यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.
‘गेटआउट रवि’ पोस्टर्स
राज्यपाल रवी यांच्या ‘तामिळनाडू’ऐवजी ‘तमिझगम’ नाव सुचविण्यात आल्याने द्रमुक कार्यकर्त्यांमध्ये संताप दिसून आला आहे. तसेच ट्विटरवर ‘हॅशटॅग गेटआउट रवी’ ट्रेंड करत आहे. रवी यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी द्रमुक तसेच त्याच्या सहकारी पक्षांकडून केली जात आहे. विधानसभेत झालेल्या वादाच्या दुसऱया दिवशी चेन्नईच्या काही भागांमध्ये ‘गेटआउट रवी’ असा मजकूर असलेली पोस्टर्स झळकली आहेत. या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या छायाचित्राला मोठे स्थान देण्यात आले आहे.
…तर केंद्रासोबत उभे रहा
तामिळनाडू सरकारसोबत सुरू असलेल्या वादादरम्यान राज्यपाल रवी यांनी मंगळवारी नागरी सेवा मुलाखतीच्या उमदेवारांना संबोधित केले. केंद्र आणि राज्य सरकारदरम्यान मतभेद असल्यास नागरी सेवा अधिकाऱयांनी कुठल्याही संशयाशिवाय केंद्र सरकारसोबत उभे रहायला हवे, असे रवी यांनी म्हटले आहे. तर पुडुकोट्टईमध्ये स्थानिक भाजप पदाधिकाऱयांनी राज्यपालांची प्रशंसा करणारी पोस्टर्स झळकविली आहेत. भाजपच्या अनेक ट्विटर हँडल्सनी त्यांचे समर्थन करत सत्तारुढ द्रमुकवर टीका केली आहे.