लंकेचा 4 गडय़ांनी पराभव, आदिल रशिद सामनावीर, वुडचे 3 बळी, निसांकाचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ सिडनी
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गट-1 मधून इंग्लंडने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करताना ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर घालविले. शनिवारी येथे झालेल्या या गटातील शेवटच्या सामन्यात इंग्लंडने लंकेवर केवळ 2 चेंडू बाकी ठेवून 4 गडय़ांनी थरारक विजय मिळविला. इंग्लंडच्या आदिल रशिदला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. आता या स्पर्धेत गट-1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. गट-2 मधील उपांत्य फेरीत प्रवेश करणारे संघ रविवारच्या सामन्यानंतर निश्चित होतील.
शनिवारच्या या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात लंकेने विजय मिळविला असता तर इंग्लंडचे आव्हान उपांत्य फेरीसाठी संपुष्टात आले असते आणि विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीसाठी संधी मिळाली असती. पण इंग्लंडने या सामन्यात सावध खेळी करत अखेर विजय नोंदविल्याने विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आक्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. गट-1 मध्ये न्यूझीलंड पहिल्या स्थानावर असून इंग्लंडने दुसरे स्थान मिळविले आहे. या गटामध्ये पहिल्या तीन संघांनी प्रत्येकी 7 समान गुण नोंदविले. पण सरस गुण सरासरीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
निसांका आणि कुशल मेंडीस यांनी लंकेच्या डावाला आक्रमक सुरुवात केली. या सलामीच्या जोडीने 4 षटकात 39 धावा झोडपल्या. इंग्लंडच्या वोक्सने ही जोडी फोडताना कुशल मेंडीसला झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. सलामीच्या निसांकाने 45 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 67 धावा झोडपल्या. निसांकाने आपले अर्धशतक 33 चेंडूत झळकवले. रशिदने आपल्या निर्धाव षटकामध्ये निसांकाला झेलबाद केले. धनंजय डिसिल्वाने 9 तर असालंकाने 8 धावा जमविल्या. भानुका राजपक्षेने 22 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा केल्या. इंग्लंडच्या आदिल रशिदने 4 षटकात 16 धावांमध्ये 1 गडी बाद केला. इंग्लंडतर्फे मार्क वूड सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 26 धावात 3 तर स्टोक्स, वोक्स, सॅम करन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेच्या डावात 6 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार बटलर आणि हॅलेस या जोडीने आक्रमक फटकेबाजीवर अधिक भर दिला. या जोडीने 7.2 षटकात 75 धावांची भागीदारी केली. भक्कम सलामी होऊनही इंग्लंडला नंतर अखेरच्या षटकापर्यंत झगडवावे लागले. हसरंगाने ही जोडी फोडताना कर्णधार बटलरला झेलबाद केले. त्याने 23 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 28 धावा जमविल्या. बटलर बाद झाल्यानंतर हॅलेस आणि स्टोक्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हसरंगाने हॅलेसला टिपले. त्याने 30 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 47 धावा झळकविल्या. स्टोक्सने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून एक बाजू मजबूत राखली होती. सलामीची जोडी फुटल्यानंतर इंग्लंडचे 4 फलंदाज 36 धावात बाद झाले. धनंजय डिसिल्वाने स्वतःच्याच गोलंदाजीवर ब्रुकचा झेल घेतला. त्याने 4 धावा केल्या. कुमाराने लिव्हिंगस्टोनचा (4) बळी मिळविला. धनंजय डिसिल्वाने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना मोईन अलीला शनाकाकरवी झेलबाद केले. कुमाराने सॅम करनला बाद करून सामन्याला रंगत आणली. सॅम करन बाद झाला त्यावेळी इंग्लंडची स्थिती 18 षटकात 6 बाद 129 अशी होती. त्यांना विजयासाठी 12 चेंडूत 20 धावांची जरुरी होती. स्टोक्स आणि वोक्स यांनी विजयाचे सोपस्कार केवळ 2 चेंडू बाकी असताना केले. स्टोक्स 36 चेंडूत 2 चौकारांसह 42 धावांवर तर वोक्स 5 धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडच्या डावामध्ये 2 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे कुमारा, हसरंगा आणि धनंजय डिसिल्वा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
लंका 20 षटकात 8 बाद 141 (निसांका 67, कुशल मेंडीस 18, राजपक्षे 22, धनंजय डिसिल्वा 9, हसरंगा 9, मार्क वूड 3-26, स्टोक्स 1-24, वोक्स 1-24, सॅम करन 1-27, आदिल रशिद 1-16), इंग्लंड 19.4 षटकात 6 बाद 144 (बटलर 28, हॅलेस 47, स्टोक्स नाबाद 42, सॅम करन 6, ब्रुक 4, लिव्हिंगस्टोन 4, मोईन अली 1, वोक्स नाबाद 5, कुमारा 2-24, हसरंगा 2-23, धनंजय डिसिल्वा 2-24).