सरकार नियम लागू करण्याच्या तयारीत : राष्ट्रीय सुरक्षेकरीता उचलणार महत्त्वाचे पाऊल: विविध कंपन्यांना बसणार फटका
नवी दिल्ली
मोबाईल ग्राहकांना आता स्मार्टफोनमधून प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स काढून टाकण्याची सुविधा मिळणार असल्याचे संकेत आहेत. या संदर्भात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकार लवकरच नियम लागू करणार असल्याची माहिती आहे. कंपन्यांना अॅप्स काढून टाकण्याचा पर्याय दिला जाईल. लोकांच्या सुरक्षेची जाणीव ठेवून भारत सरकार मोबाईल उत्पादक कंपन्यांवर कडक कारवाई करणार असल्याचीही माहिती आहे.
याअंतर्गत आता कंपन्यांना मोबाइलमध्ये प्री-इंस्टॉल केलेले अॅप अनइंस्टॉल करण्याचा पर्याय द्यावा लागणार आहे. याशिवाय ऑपरेटिंग सिस्टिममधील प्रमुख अपडेट्सही दाखवावे लागणार आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, सरकारच्या या निर्णयाचा फटका सॅमसंग, शाओमी, विवो आणि अॅपल या सारख्या कंपन्यांना बसणार आहे. या कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स आहेत, जे वापरकर्ते त्यांच्या फोनमधून अनइंस्टॉल करू शकत नाहीत.
भारतीय स्पर्धा आयोगाच्या दंडानंतर, गुगलने आपल्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम आणि गुगल प्ले स्टोअरमध्ये भारतीय बाजारासाठी अनेक बदलांची घोषणा केली होती. नवीन सुरक्षा नियमाबाबत फारशी माहिती समोर आलेली नसून, नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. मात्र, भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोन्स मागणीची बाजारपेठ आहे.असा कठोर निर्णय घेतला तर कंपन्यांना त्याकडे दुर्लक्ष करणे सोपे जाणार नाही.
सरकार हेरगिरी आणि डाटाच्या गैरवापराबद्दल चिंतेत
रॉयटर्सच्या अहवालानुसार, आयटी मंत्रालय हेरगिरी आणि वापरकर्त्यांच्या डाटाच्या गैरवापराबद्दल चिंतित आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सरकार सध्या नियमांवर विचार करत आहे. पूर्व-स्थापित अॅप्स कमकुवत असू शकतात. याचा फायदा चीनसह कोणत्याही परकीय शक्तीने घ्यावा असे आम्हाला वाटत नाही. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज मोबाईल वापरू नयेत. अलीकडेच गुप्तचर यंत्रणांनी म्हटले होते की, देशातील सैनिकांनी चिनी मोबाईल फोन वापरू नये.
चीनच्या 300 अॅपवर बंदी
भारताने चीनच्या 300 अॅपवर बंदी घातली आहे.केंद्र सरकार 2020 पासून चिनी तंत्रज्ञान कंपन्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेत आहे. भारत सरकारने आतापर्यंत 300 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.