दोन्ही देशांमध्ये युपीआय करार, शस्त्रास्त्र खरेदीलाही चालना, बॅस्टिल दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी
वृत्तसंस्था / पॅरिस
पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च ‘ग्रँड क्रॉस ऑफ लीजन ऑफ ऑनर’ पुरस्कार देण्यात आला आहे. ते सध्या फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना हा पुरस्कार या देशाची राजधानी पॅरिस येथे देण्यात आला. त्यासमवेतच भारत आणि फ्रान्स यांच्यात युपीआयच्या उपयोगासंदर्भात करार करण्यात आला आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या बॅस्टिल दिन या सर्वात महत्वाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सन्मान स्वीकारला. तसेच भारतीय समुदायाच्या कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला. भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण साधने खरेदीलाही चालना देण्यात आली.
बॅस्टिल दिन हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या नात्याने पंतप्रधान मोदींना आमंत्रित करण्यात आले होते. याच कार्यक्रमात त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी हा पुरस्कार मिळविण्यासाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनींही त्यांची प्रशंसा केली. त्यांच्या काळात भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होत आहेत. त्यांचा हा सहावा फ्रान्स दौरा आहे.
भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी पॅरीस येथे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांनी त्यानंतर फ्रान्सचे पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. गुरुवारी रात्री फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी त्यांच्यासाठी खासगी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. शुक्रवारी त्यांनी मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. भारताच्या युपीआयचा उपयोग फ्रान्समध्ये करण्यासंबंधीचा करार त्यानंतर करण्यात आला. यामुळे आता फ्रान्समध्येही भारतीय ऑन लाईन आर्थिक व्यवहार करु शकणार आहेत. त्यामुळे या कराराचे महत्व आहे.
पंतप्रधान मोदींकडून आभार
फ्रान्सचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले. हा पुरस्कार संपूर्ण भारताचाच सन्मान आहे. तो मी विनम्रतेने स्वीकारतो. या पुरस्कारासाठी माझी निवड करण्याकरिता मी फ्रान्सचे अध्यक्ष आणि जनता यांचा आभारी आहे. माझा फ्रान्सशी संबंध खूप जुना आहे. 40 वर्षांपूर्वी अहमदाबाद येथे फ्रान्सचे सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्या केंद्राचा प्रथम सदस्य आज भारताचा पंतप्रधान या नात्याने तुमच्या समोर आहे. अशा भावोत्कट शब्दांमध्ये त्यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर कार्यक्रमात त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
शस्त्रखरेदीला चालना
भारत फ्रान्सकडून आणखी 26 राफेल विमाने खरेदी करणार आहे. तसेच आणखी तीन स्कॉर्पियन पाणबुड्याही भारताला पुरविल्या जाणार आहेत. या व्यवहारांसंबंधी भारताचे अधिकारी आणि फ्रान्सचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. विमानांची क्षमता आणि किंमत निर्धारित केल्यानंतर अंतिम करार केला जाणार आहे. ही विमाने भारतीय नौदलासाठी खरेदी केली जाणार आहेत. तंत्रज्ञान हस्तांतरणासंबंधीही चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतीय सैनिकांचा सहभाग
बॅस्टिल दिन या फ्रान्सच्या राष्ट्रीय कार्यक्रमात आणि त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या संचलनात भारताच्या सैनिकांनीही सहभाग घेतला होता. भारताच्या तीन्ही सेनादलांचे सैनिक या संचलनात फ्रान्सच्या सैनिकांसह सहभागी झाले होते. भारताचे आंतरराष्ट्रीय महत्व वाढले असल्याची प्रचिती यातून येते, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी आणि सर्वसामान्यांनीही व्यक्त केली आहे.
भारतीय समुदायाकडून जल्लोष
पंतप्रधान मोदी यांनी पॅरीस येथे भारतीय वंशाच्या समुदायाने आयोजित केलेल्या समारंभातही भाग घेतला. गुरुवारी तो आयोजित करण्यात आला होता. विविध देशांमधील भारतीयांनी त्यांच्या कष्टाने इतर देशांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांनी भारताची ख्याती वाढविली आहे. भारतीय नागरीक भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावत आहेत. ते येथे राहूनही भारताला लाभ करुन देत आहेत. त्यांच्यामुळे भारताची प्रतिष्ठा विदेशांमध्ये वाढली आहे. भारतीयांनी हे कार्य पुढे सुरु ठेवावे, अशी भलावण त्यांनी या कार्यक्रमात केली.