पॅव्हिक-किचेनॉक मिश्र दुहेरीत अजिंक्य, स्विटोलिना, साबालेंका पराभूत
वृत्तसंस्था/ लंडन
2023 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत ट्युनिशियाची सहावी मानांकित ऑन्स जेबॉर तसेच झेकची मर्केटा व्होन्ड्रूसोव्हा यांच्यात शनिवारी महिला एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होणार आहे. जेबॉरने उपांत्य लढतीत द्वितीय मानांकित साबलेंकाचा तर झेकच्या डावखुऱ्या व्होन्ड्रूसोव्हाने स्विटोलिनाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत क्रोएशियाच्या पॅव्हिक आणि युक्रेनच्या किचेनॉक यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले.
महिला एकेरीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सहाव्या मानांकित जेबॉरने आपल्या दर्जेदार खेळाचे दर्शन घडवताना द्वितीय मानांकित आर्यना साबालेंकाचा 6-7 (5-7), 6-4, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. मात्र या सामन्यात साबालेंकाने ट्रायब्रेकरमधील पहिला सेट जिंकून जेबॉरवर आघाडी मिळवली होती पण जेबॉरने पुढील दोन सेट्समध्ये आपल्या डावपेचात बदल करत तसेच बेसलाईन खेळावर आणि वेगवान सर्व्हिसच्या जोरावर साबालेंकाचे आव्हान संपुष्टात आणले. जेबॉरने गेल्या वर्षीही या स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. जेबॉर आता या स्पर्धेतील जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकनात साबालेंकाने अग्रस्थान मिळवले आहे. साबालेंका आणि जेबॉर यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 140 मिनिटे चालला होता.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात झेकच्या बिगर मानांकित मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाने युक्रेनच्या द्वितीय मानांकित स्विटोलिनाचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी व्होन्ड्रूसोव्हा ही पहिली बिगर मानांकित महिला टेनिसपटू आहे. गेल्या एप्रिलमध्ये आपल्या प्रसुती रजेनंतर स्विटोलिनाची ही दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. या उपांत्य लढतीत व्होन्ड्रूसोव्हाने 22 तर स्विटोलिनाने 9 विजयी फटके नेंदवले.
या स्पर्धेत क्रोएशियाचा मेट पॅव्हिक आणि त्याची साथीदार युक्रेनची लुडमिला किचेनॉक यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात पॅव्हिक आणि किचेनॉक यांनी बेल्जियमची जोरान विलिगेन आणि चीनचा झु इफेन यांचा 6-4, 6-7 (9-7), 6-3 असा पराभव केला. सहा वर्षापूर्वी पॅव्हिक आणि किचेनॉक या जोडीने विम्बल्डन स्पर्धेत आपले पदार्पण केले होते. सहा वर्षानंतर या जोडीने विम्बल्डनचे जेतेपद मिळवण्याचे उद्दिष्ट गाठले. हा अंतिम सामना तब्बल दोन तास चालला होता. 15 व्या मानांकित किचेनॉकने 20 विजेत्या फटक्यांची नोंद केली. विम्बल्डनच्या इतिहासामध्ये 30 वर्षीय किचेनॉक ही कोणत्याही विभागातील विजेतेपद मिळवणारी युक्रेनची पहिली टेनिसपटू आहे.