भक्तिमय वातावरणात गौराईचे स्वागत
कोल्हापूर/ प्रतिनिधी
लाडक्या गणरायापाठोपाठ लाड पुरवून घेण्यासाठी गौराईचे घरोघरी धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. ‘गौराई आली सोन पावलांनी… गौराई आली माणिक मोत्यांच्या पावलांनी’ म्हणत या माहीरवाशिणींच्या साजशृंगारासह तिचे लाड पुरवण्यासाठी मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे महिलांची लगबग पाहायला मिळाली. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून गौरीच्या आगमनाची महिलांची लगबग दिसून आली. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात महिला गौराईला घेऊन कुंभी- धामणी नदी घाटावर गेल्या. मोठ्या भक्तिमय वातावरणात महिलांनी या नदीपासून गौरीला डोक्यावर घेऊन आपल्या घरी नेले.
गौरीचे पारंपरिक पद्धतीने आणि सोनपावलांनी आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले. उद्या शुक्रवारी गौरीला साजशृंगार करण्यासाठी महिला विशेष परिश्रम घेताना दिसणार आहेत. आपली गौरी छानच दिसावी, ती सर्वांपेक्षा सुंदर दिसावी, असा अट्टहास पहावयास मिळणार आहे. मल्हारपेठ येथील माळ वस्तीवरील महिलांनी गवळदेव येथून गौराई वाजत गाजत घरी नेली.
आज पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवैद्य गौरीला दाखवला जातो तर उद्या पुरणपोळीचा नैवद्य आपल्या लाडक्या गौराईला दाखवला जातो.