अनेक वर्षे जुनी अंगदुखी होते दूर, रंगांधळे लोकांकरता थेरपी लाभदायक
अमेरिकेत 5 कोटीहून अधिक लोक कुठल्या न कुठल्या प्रकारच्या वेदनेला तोंड देत आहेत. थेरपी, मसाज आणि औषधांची मदत घेऊनही त्यांच्या या वेदना दूर होत नसल्याची स्थिती आहे. अनेक औषधांची आता सवय होऊन बसली आहे. अलिकडेच यासंबंधी डय़ुक युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात ग्रीन लाइटमध्ये काही काळ वेळ घालविल्यावर सर्वप्रकारच्या वेदना कमी होतात किंवा संपुष्टात येतात असे दिसून आले आहे.
या प्रकाराला ग्रीन लाइट थेरपी नाव देण्यात आले आहे. या थेरपीचा कुठलाच दुष्परिणाम नाही तसेच त्याची सवयही लागत नाही. प्रमुख संशोधिका डॉक्टर पद्मा गुलूर यांनी फायब्रोमायल्गिया (स्नायू दुखी)च्या रुग्णांवर एक प्रयोग केला. दोन आठवडय़ांपर्यंत दरदिनी 4 तासांपर्यंत वेगवेगळय़ा रंगाचे चष्मे परिधान करण्यास देण्यात आले. काहींनी निळय़ा, काहींनी रंगरहित तर काही जणांनी हिरव्या रंगाचा चष्मा परिधान केला. याचे परिणाम समोर आल्यावर हिरव्या रंगाचा चष्मा परिधान करणाऱया लोकांमध्ये वेदनेची चिंता कमी झाल्याचे आणि त्यांनी पेनकिलर्सचे सेवन करणे कमी केल्याचे आढळून आले आहे.
अध्ययनाच्या निष्कर्षाने लोक इतके आनंदी होते की त्यांनी चष्मा परत करण्यास नकार दिला. हिरवा प्रकाश हा डोळय़ांवाटे मेंदूपर्यंत पोहोचतो. डोळय़ातील मेलानोप्सिन ऍसिड हिरव्या रंगाच्या प्रकाशामुळे ट्रिगर होऊन जातो. मेलानोप्सिन ऍसिडच मेंदूत वेदनेवर नियंत्रण मिळविणाऱया हिस्स्याला सिग्नल पाठविण्याचे काम करतो. मेलानोप्सिन ऍसिड हिरव्या रंगामुळे ट्रिगर होत असल्याने मेंदूत वेदना कमी करणारा एक नवा मार्ग खुला होत असल्याचा दावा डॉक्टर गुलूर यांनी केला आहे.
एरिझोन युनिव्हर्सिटीचे डॉक्टर मोहम्मद इब्राहिम यांनी ग्रीन लाइटचे मायग्रेन पीडितांवर अध्ययन केले. यात मायग्रेनमुळे होणाऱया वेदनेत 60 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. वेदनेची तीव्रता 40 टक्क्यांपर्यंत राहिली होती. स्नायूदुखीही कमी झाली होती.