प्रतिनिधी / बेळगाव
ग्रामीण भागापर्यंत आणि वंचितांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. त्यासाठी आयएमएने प्रयत्न करावेत आणि डॉक्टर व रुग्ण यांचे नाते अधिक दृढ करावे, अशी अपेक्षा डॉ. अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
आयएमएच्या बेळगाव शाखेच्या नूतन पदाधिकाऱयांच्या अधिकारग्रहण समारंभात ते बोलत होते. आयएमए बेळगावच्या अध्यक्षा म्हणून डॉ. स्वप्ना महाजन, सचिव डॉ. हेमंत कौजलगी व खजिनदार डॉ. बसवराज बिज्जर्गी यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱयांनी अधिकारग्रहण केले. व्यासपीठावर मावळत्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ व सचिव डॉ. संतोष शिंदे उपस्थित होते.
डॉ. अजित कुलकर्णी यांनी समाजामध्ये डॉक्टरांची भूमिका आणि त्यांची नैतिक सेवा याबद्दल विवेचन करून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध कसे दृढ होतील, याबाबत माहिती दिली. डॉ. स्वप्ना महाजन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. आणि समाज यांच्यात वाढत असलेले अंतर कमी कसे करता येईल याबद्दल विचार व्यक्त करून डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रातील नवतंत्रज्ञान अवगत करून घ्यावे, असे सांगितले.
डॉ. आय. एस. पाटील यांनी आयएमएच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. एस. बी. कुलकर्णी यांनी आयएमएचा प्रवास कथन केला. याप्रसंगी डॉ. अनिल महाजन, डॉ. वैशाली देशपांडे, डॉ. सुचित्रा लाटकर, डॉ. ग्रीष्मा गिजरे, डॉ. दत्तप्रसाद गिजरे यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.