प्रतिनिधी /पणजी
भारताला विस्तीर्ण आणि निसर्गरम्य किनारपट्टी, सुंदर बेटे, समृद्ध वारसा असलेली विविध बंदरे आणि पर्यटन स्थळे आहेत. क्रूझ सेवेच्या विकासासाठी व पूरक संसाधने विकसित करण्यासाठी ‘द ट्रायडंट’, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पहिली अखिल भारतीय क्रूझ परिषद 2022चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या उद्घाटन समारंभाला आणि सत्रांना मुख्यतः क्रूझ मालक, सीईओ, एमडी, शिपिंग एजन्सी आणि सरकारी प्रतिनिधी, ट्रव्हल आणि पर्यटन क्षेत्रातील दिग्गज प्रतिनिधींची उपस्थिती होती.
सदर परिषदेचे उद्घाटन केंद्रीय बंदर जहाज, जलमार्ग व पर्यटनमंत्री सर्वानंद सोनवाल यांच्याहस्ते झाले. उद्घाटन सोहळय़ाला केंद्रीय बंदर जहाज व जलमार्ग आणि आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, केंद्रीय पर्यटन महासंचालक जी.व्ही.के. राव, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव डॉ. संजीव रंजन, पोर्टस आणि शिपिंग एफआयसीसीआय तसेच जेएम बक्सी ग्रुपचे एमडी ध्रुव कोटक, मुंबई प्राधिकरण व मुरगाव बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आदेश तितरमारे, डीजी शिपिंगचे डीजी अमिताभ कुमार, अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय बंदोपाध्याय, खासदार राहूल शेवाळे, तामिळनाडूचे पर्यटनमंत्री एम. मॅथीवेन्तन, लाईट हाऊसचे संचालक मुरूगनंदन, अरविंद सावंत यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
क्रूझ सर्किटचा विकास, पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाचा विकास, आदरातिथ्य आणि शिपिंग, अनुकूल धोरण पर्यावरण आणि महामारीनंतरचा दृष्टीकोन आणि क्रूझ क्षेत्रातील संधी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय जलमार्गाची शक्यात आणि तंत्रज्ञानाची भूमिका हे चर्चेचे मुख्य भाग होते. मान्यवरांच्या उपस्थितीत 8 कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले. भारतातील क्रूझ पर्यटन सुलभ करण्यासाठी जहाजबांधणी मंत्री, आंग्रिया सीगल लिमिटेड, गोवा आणि मुंबई बंदर प्राधिकरणाने आगामी क्रूझ हंगामासाठी मुंबईला ‘होम पोर्टिंग क्रूझशिपद्वारे क्रूझच्या सहकार्य, विकास आणि प्रोत्साहन यासाठी सामजंस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ही परिषद बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, मुंबई बंदर प्राधिकरण, एफआयसीसीआय, सागरमाला आणि गती शक्ती यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.