NIA : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात अटक केलेल्या आरोपी शमिल साकिब नाचन याच्या ठाण्यातील घरी गुरुवारी धाड टाकली. या धाडीत अनेक मोबाईल फोन, हार्ड डिस्क आणि काही हस्तलिखित कागदपत्रे सापडली आहेत. इसिस दहशतवादी संघटनेने काही संवेदनशील ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून देशातील जातीय सलोखा बिघडविण्याचा कट रचल्याचा पर्दाफाश एनआयएने कारवाईत दरम्यान पुढे केला आहे.शमिल हा झुल्फिकार अली बडोदावाला, महम्मद इम्रान खान, महम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादीर पठाण या पाच आरोपींसह काही अन्य संशयितांसोबत काम करत होता.
शमिल आणि इसिस ‘स्लीपर सेल’च्या इतर सदस्यांनी पुण्यातील कोंढवा येथील एका घरात बॉम्ब बनविण्याचे साहित्य एकत्र केले होते. त्यांनी गेल्या वर्षी बॉम्ब तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेत भाग घेतला होता. तसेच, त्यांनी बनवलेल्या बॉम्बची चाचणी घेण्यासाठी जंगलात नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता.त्यातील ‘सुफा’ दहशतवादी संघटनेचे सदस्य इम्रान खान आणि युनूस साकी या दोघांना पुणे पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. एनआयएने ‘मोस्ट वाँटेड’ घोषित केलेल्या या दोघांवर एप्रिलमध्ये राजस्थानमधील कारमधून स्फोटके जप्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
देशातील शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी कृत्ये करण्याचा कट रचण्यात आला होता. देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने दहशत आणि हिंसाचार पसरवण्यासाठी आयएसआयएसच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची आरोपींची योजना होती.