गोंधळी गल्लीत 12 लाखांची घरफोडी, ठसेतज्ञांना पाचारण
प्रतिनिधी/ बेळगाव
उपनगरातील चोऱ्यांचे लोण आता भरवस्तीतील गल्ल्यांमध्येही सुरू झाले आहे. गोंधळी गल्ली येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 12 लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. शनिवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
व्यवसायाने मेकॅनिकल टेक्निशियन असणाऱ्या चेतन मनोहर कुरणे यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला. शुक्रवार दि. 11 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गोंधळी गल्ली येथील आपल्या घराला कुलूप लावून चेतन गणेशपूर येथील बहिणीच्या घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 7 वाजता आपल्या घरी परतले, त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता.
कडीकोयंडा तोडून अज्ञातांनी घरात प्रवेश केल्याचे आढळून आले. चोरीचा प्रकार उघडकीस येताच खडेबाजार पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.
चोरट्यांनी तिजोरी फोडून सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, अंगठ्या, ब्रेसलेट, चेन, अंगठ्या, मोहनमाळ, कर्णफुले आदी 264 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 लाख 30 हजार रुपये रोकड असा एकूण सुमारे 12 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लांबविला आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आता गल्ल्यांमध्येही चोरीचे प्रकार
आता गल्ल्यांमध्येही चोऱ्यांचे लोण पसरले आहे. याआधी केवळ उपनगरातील बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य बनविली होती. आता गजबजलेल्या गल्ल्यांमध्येही चोरीचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.