निवडणुकीच्या 21 महिने आधी अर्धे मंत्रिमंडळ बदलले; महिला मंत्र्यांच्या संख्येत वाढ
भुवनेश्वर / वृत्तसंस्था
ओडिशात विधानसभा निवडणुकीच्या 21 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अर्धे मंत्रिमंडळ बदलले आहे. भुवनेश्वर येथील राजभवनात झालेल्या शपथविधी समारंभात 21 मंत्र्यांनी शपथ घेतली असून त्यात 10 नवीन चेहरे आहेत. तसेच महिलांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. मागील मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले जगन्नाथ सरकार यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. तसेच 2019 मध्ये ओडिशा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्मयाने विजयी झालेल्या रिटा साहू यांनाही मंत्री करण्यात आले आहे.
मार्च 2024 मध्ये ओडिशामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. नवीन पटनायक यांनी नव्या मंत्रिमंडळात महिला चेहऱयाला स्थान दिले आहे. यापूर्वीच्या मंत्रिमंडळात केवळ 3 महिला मंत्र्यांना स्थान देण्यात आले होते, तर नव्या मंत्रिमंडळात महिला कोटय़ातून 5 मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता सोमवारी खात्यांची विभागणी होणार आहे.
काही प्रभावी मंत्र्यांना डच्चू
मागील सरकारमध्ये प्रभावी मंत्री असलेले विक्रम केसरी आणि प्रताप जेना यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नाही. कामगिरीच्या आधारे दोघांनाही हटवण्यात आले आहे. केसरीकडे वन आणि जेना यांच्याकडे पंचायतराज खाते होते. याशिवाय आरोग्यमंत्री राहिलेल्या नबा किशोर दास यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
2024 च्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित
पटनायक सरकारने 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार केल्याचे मानले जात आहे. पटनायक गेल्या 22 वर्षांपासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राजकारणात 25 वर्षे पूर्ण केली आहेत. ते 1997 मध्ये आस्का लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे वडील बिजू पटनायक हे ओडिशाचे प्रसिद्ध नेते होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी बिजू जनता दलाची स्थापना केली आणि तेव्हापासून ते दीर्घकाळ राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दलाने ओडिशामध्ये 2000, 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग पाचवेळा सरकार स्थापन केले आहे.