नववर्षाच्या सुरवातीलाच अपघात
प्रतिनिधी /मडगाव
नववर्षाच्या सुरुवातीलाच गुड्डेमळ-सावर्डे येथे वॅगर आर आणि ऍक्टिव्हा स्कुटर यांच्या दरम्यान झालेल्या अपघातात स्कुटरचालक श्यामसुंदर तेंडुलकर (60) निरंकाल-दाबाळ हे जागीच ठार झाले. तर या अपघातात अन्य एक महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
उपलब्ध माहितीप्रमाणे श्यामसुंदर तेंडुलकर हे आपल्या ऍक्टिव्हा स्कुटरवरून सावर्डेच्या बाजूने येत असताना गुड्डेमळ येथे एका वॅगन आर कारने त्यांच्या स्कुटरला जोरदार धडक दिली. त्यात श्यामसुंदर तेंडुलकर हे जागीच ठार झाले. त्यांच्या स्कुटरवर एक महिला होती. या अपघातात ती जखमी झाल्याने तिला हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. वॅगन आर कार भरधाव वेगात होती व रस्त्याच्या विरूद्ध बाजूने जात स्कुटरला जोरदार धडक दिली.
निष्काळजीपणे कार चालविल्याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी चालक सिद्धेश कुंकळळीकर (शिरवडे-मडगाव) याला ताब्यात घेतले होते. या अपघातप्रकरणी कुडचडे पोलीस पुढील तपास करीत आहेत. ऐन नववर्षाच्या पहिल्याच दिवशी निरंकाल-दाबाळ येथील वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
झुआरी नव्या पुलावर वर्षारंभीच अपघात तीन पर्यटक किरकोळ जखमी
वास्को : गुरूवारी रात्री उद्घाटन होऊन शुक्रवारी दुपारी वाहतुकीस खुला झालेल्या झुआरी नदीवरील नव्या चौपदरी पुलावर रविवारी सकाळी पहिला अपघात घडला. या पुलावरील या पहिल्या अपघातात सुदैवाने तिघेजण बचावले. नव्या वर्षांच्या स्वागताच्या धुंदीत पर्यटकांनी हा अपघात घडवला अन् नव्या पुलावर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिल्या अपघाताची नोंद केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी सकाळी आठच्या सुमारास आगशीच्या दिशेने मुख्य पूल ओलांडल्यानंतर घडला. तिघे तेलंगणातील पर्यटक कुठ्ठाळीहून पणजीच्या दिशेने आपल्या कारमधून निघाले होते. नदीवरील पूल पार करून थोडे पुढे जाऊन त्यांनी पुलाच्या कठडय़ाला धडक दिली. धडक दिल्यानंतर ही कार पलटी झाली. या कारमधील तिघेही पर्यटक किरकोळ जखमांवर बचावले. अपघातामुळे कारचे मात्र मोठे नुकसान झाले. कार चालवताना चालकाला डुलकी आल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वेर्णा पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झालेली आहे.