केंद्र सरकारचा इशारा, जोडणीसाठी 31 मार्चपर्यंत कालावधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्व नागरिकांनी आपली पॅन कार्डस् आधार कार्डाशी जोडून घ्यावीत, असा निर्वाणीचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. पॅन-आधार जोडणीसाठी 31 मार्च 2023 हा अंतिम कालावधी निर्धारित करण्यात आला असून त्यात जोडणी न झाल्यास पॅन कार्ड निकामी होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले असून ज्यांनी आतापर्यंत ही जोडणी केलेली नाही त्यांनी विशेष लक्ष या सूचनेकडे द्यावे, असे बजावण्यात आले आहे.
केंद्रीय कर विभागाने नुकत्याच दिलेल्या सूचनेनुसार हा इशारा देण्यात आला आहे. ज्या नागरिकांनी (नोटिफिकेशन क्रमांक 37/2017 अनुसार ज्यांचा अपवाद आहे. ते नागरिक वगळता) विनाविलंब पॅन-आधार जोडणी करून घ्यावी. ही जोडणी करण्यासाठी सोपी प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही ही जोडणी करताना अडचण येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
जोडणीला कालावधी वाढ
आधीच्या सूचनेनुसार पॅन आणि आधार जोडण्यासाठी अंतिम कालावधी 31 मार्च 2022 हा होता. तथापि अद्यापही अनेकांनी जोडणी केलेली नाही. त्यामुळे कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवून देण्यात आला आहे. मात्र, यापुढे ही जोडणी करावयाची असल्यास 30 जून 2022 पर्यंत 500 रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे. तसेच 31 मार्च 2023 पर्यंत जोडणी न केल्यास 1000 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
जोडणी कशी करावी
1) https://www.incometax.gov.in/iec/foportal/ ही वेबसाईट उघडून त्यातील ‘क्विक लिंक्स’ हा सेक्शन उघडून त्यातील लिंक आधार ऑप्शन क्लिक करणे.
2) नंतर आपला पॅन आणि आधार क्रमांक आवश्यक त्या बॉक्समध्ये नोंदवून नंतर व्हॅलिडेट या बॉक्सवर क्लिक करणे. आधार आणि पॅन आधीच लिंक झालेले असेल तर तसा संदेश येईल.
3) मात्र, पॅन आणि आधार जोडले गेलेले नसेल तर आपल्याला निर्धारित शुल्काचे चलन एनएसडीएल या पोर्टलवर भरावे लागेल. पेमेंटची माहिती व्हॅलिडेट झाल्यानंतर आपल्याला पॉप अप मेसेज येईल.
4) नंतर आवश्यक ती माहिती भरल्यानंतर लिंक आधार ऑप्शन क्लिक केल्यानंतर व इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जोडणी पूर्ण होईल. यासाठी वेबसाईटवर दिसणाऱया सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे.