निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष आमंत्रित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
निवडणूक आयोग सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा (आरव्हीएम) प्रोटोटाइम दाखविणार आहे. आयोगाने 8 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि 57 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांना सोमवारी सकाळी आमंत्रित केले आहे. रिमोट व्होटिंगचा वापर करून स्थलांतरित मतदारांच्या भागिदारीत सुधाराच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांना चर्चेसाठी आमंत्रित पेल्याचे आयोगाने म्हटले आहे.
रिमोट ईव्हीएमच्या प्रदर्शनादरम्यान आयोगाच्या तांत्रिक तज्ञ समितीचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. आरईव्हीएम लागू केल्यास स्थलांतरित मतदारांना स्वतःचा मताधिकार बजावण्यासाठी मूळ गावी जाण्याची गरज भासणार नाही. आरईव्हीएमला ईव्हीएमवर आधारित एक मजबूत, त्रुटीहीन स्वरुपात विकसित केले जाणार आहे तसेच ते इंटरनेटशी कनेक्टेड नसणार आहे.
एका सरकारी कंपनीकडून निर्मित मल्टी कॉन्स्टीटय़ुएन्सी रिमोट ईव्हीएम एकाच ठिकाणाहून 72 मतदारसंघांना संचालित करू शकते. मतदानाबद्दल तरुणाई आणि शहरातील लोकांमध्ये आढळून आलेल्या उदासीनतेच्या पार्श्वभूमीवर रिमोट व्होटिंग मशीन लोकशाही प्रक्रियेत भागीदारी वाढविण्यात उपयुक्त पुढाकार ठरणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.