मंत्री गोविंद गावडे यांनी दिलेली माहिती : ‘मंत्री तुमच्या दारी’ उपक्रमाच्या अंतर्गत बाणावली मतदारसंघाचा दौरा
प्रतिनिधी /मडगाव
बाणावली मतदारसंघात जी विकासकामे सुरू आहेत ती पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार असून त्यानंतर नवीन विकासकामे प्राधान्यक्रमाने हाती घेतली जाणार असल्याची माहिती क्रीडा, कला आणि संस्कृती आणि ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे यांनी दिली. ‘मंत्री तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत शुक्रवारी त्यांनी बाणावली मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी स्थानिक आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस, विविध विभागांचे अधिकारी, पंच, सरपंच उपस्थित होत.
यावेळी ओडली गावात खुली व्यायामशाळा उभारण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली. याशिवाय करमणे, केळशी पंचायतींना भेट देऊन तेथे पडून असलेली कामे तसेच नव्याने राबविण्याची आवश्यकता असलेली विकासकामे यांची माहिती मंत्री गावडे यांनी जाणून घेतली व त्यानुसार अधिकाऱयांना आवश्यक निर्देश दिले. मंत्री तुमच्या दारी उपक्रमाच्या अंतर्गत मतदारसंघांना भेटी देऊन आणि तेथील आमदार तसेच पंच, सरपंच यांच्या भेटी घेऊन आवश्यक विकासकामे मार्गी लावण्याचे सरकारचे प्रयत्न आहे. हे सरकार लोकांचे व लोकांसाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्राधान्यक्रमाने विकासकामे मार्गी लावली जाणार असून लोकप्रतिनिधींनी त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची गरज गावडे यांनी प्रतिपादली.
गावागावात क्रीडा सुविधा देण्यावर भर
क्रीडा क्षेत्रात गोव्यातून अव्वल खेळाडू तयार होऊन त्यांनी देशाचे प्रतिनिधीत्व करावे अशी क्रीडामंत्री म्हणून आपली तसेच सरकारची मनीषा आहे. त्याअनुषंगाने विविध क्रीडा प्रकारांसाठी गावागावात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर आमचा भर आहे. जेथे सुविधा आहेत त्या अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे, असे गावडे यांनी सांगितले. युवकांनी व्यायामशाळांचा उपयोग करून तंदुरुस्त होण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रात नाव कमावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
कामे पूर्ण करून घेणार : आमदार व्हिएगस
बाणावली मतदारसंघातील मंत्री गावडे यांच्या कार्यक्षेत्राखाली येणारी व सध्या सुरू असलेली कामे तसेच जी कामे करण्याची आवश्यकता आहे त्यासंदर्भात पाहणी करून चर्चा करण्यात आली आहे. कामांचा प्राधान्यक्रम मंत्र्यांना कळविण्यात येणार आहे व ही कामे पाठपुरावा करून आपण पूर्ण करून घेणार आहे, अशी माहिती आमदार व्हिएगस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वेळ्ळी क्रीडा संकुलाचे 10 नोव्हेंबरला उद्घाटन
वेळ्ळी येथील क्रीडा संकुलाचे उद्घाटन 10 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी दिली. सदर संकुल बांधून तयार असून त्याचे लोकार्पण करण्यासाठी वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा आपल्याकडे पाठपुरावा करत राहिले आहेत. शुक्रवारी त्याची पाहणी करून 10 नोव्हेंबर ही तारीख उद्घाटनासाठी निश्चित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी कित्येक प्रस्ताव दिले आहेत. ते प्राधान्यक्रमाने हाती घेतले जातील. जिल्हा पंचायत निवडणुकीत व्यस्त असल्याने ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेले नसले, तरी त्यांनी विकासकामांची यादी दिली आहे, असे गावडे यांनी सांगितले.