ऑनलाईन टीम / तरुण भारत :
खा. गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यातील लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती असल्याचे पवार यांनी सांगितले.
टिंबर मार्केटमधील गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा आढावा आज अजित पवार यांनी घेतला. आगीच्या घटनेची चौकशी व्हावी, तसेच आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. त्यावेळी पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होणार का? असे अजित पवार यांनी मीडियाने विचारले. त्यावेळी ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही, असं मला वाटतं होतं. पण आता या जागेवर पोटनिवडणूक लागणार असल्याची माझी आतल्या गोटातली बातमी आहे.
इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. रवींद्र धांगेकरांना निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी मदत केली. जिथे निवडणूक लागेल तिथे ज्यांची ताकद जास्त आहे, त्यांना उमेदवारी मिळावी, असंही अजित पवार म्हणाले.