राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचा योगा दिवस कार्यक्रमात सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतासह संपूर्ण जगभरात बुधवारी नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. सुरतमध्ये जवळपास सव्वा लाख लोकांनी एकत्र येत योगसाधना केली. दुसरीकडे भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत योगासने केली. तसेच राजस्थानचे वाळवंट आणि आयएनएस विक्रांतवरही योगासने करण्यात आली. भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटनसह जगाच्या कानाकोपऱ्यातही या आंतरराष्ट्रीय दिनाच्या औचित्याने योगसाधना केल्याने संपूर्ण जग ‘योग’मय झाल्याचे दिसून आले.
यंदा 21 जून हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला आहे. नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रथमच योग सत्राचे नेतृत्व केले. त्याचबरोबर त्यांनी व्हिडीओद्वारे देशवासियांना संदेश दिला आहे. दरवषी योग दिनासाठी वेगळी थीम ठेवली जाते. यावषी ‘वसुधैव कुटुम्बकम्साठी योग’ अशी थीम ठेवण्यात आली होती. ‘एक जग, एक आरोग्य’साठी आयुष मंत्रालयाने ही थीम निवडली होती.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतात अनेक ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील सर्व बड्या राजकारण्यांनी विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून योगासने केली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जम्मूमध्ये योगासने करत उपस्थितांशी संवादही साधला. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आगरतळा येथे योगा केला. योगाचे महत्त्व ओळखून छत्तीसगड सरकारने छत्तीसगड योग आयोगाची स्थापना करून सदस्यांची नियुक्ती केली आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात योगासने केली. दरम्यान, योगाचे महत्त्व सांगताना त्या म्हणाल्या की, योग ही आपल्या सभ्यतेची एक मोठी उपलब्धी असून भारताने उर्वरित जगाला दिलेली मोठी देणगी आहे. योग शरीर आणि मन एकत्र आणण्याचे काम करतो. जीवनाकडे पाहण्याचा हा एक समग्र दृष्टिकोन आहे. योग आपल्या सर्वांना चांगल्या स्थितीत राहण्यास मदत करतो. आज, योग दिनानिमित्त मी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा आणि त्याची परिवर्तनशील शक्ती अनुभवावी असे आवाहन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नौदलाने जपला वेगळेपणा
नौदलाने ‘ओशन रिंग ऑफ योग’ तयार करत स्वत:चा वेगळेपणा जपला. भारतीय नौदलाच्या 19 जहाजांवर सुमारे 3,500 खलाशांनी योग कार्यक्रमात सहभाग नोंदवला. ही जहाजे बांगलादेशातील चितगाव, इजिप्तमधील सफागा, इंडोनेशियातील जकार्ता, केनियामधील मोंबासा, मादागास्करमधील तोमासिना, ओमानमधील मस्कत, श्रीलंकेतील कोलंबो, थायलंडमधील फुकेत आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) मधील दुबई येथील बंदरावर वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित होती. यामध्ये किल्टन, चेन्नई, शिवालिक, सुनयना, त्रिशूल, तारक, वगीर, सुमित्रा आणि ब्रह्मपुत्रा जहाजांचा समावेश होता.
भारताच्या पुढाकाराने सुरूवात
27 सप्टेंबर 2014 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त महासभेत जगातील सर्व देशांना योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. संयुक्त राष्ट्र महासभेने मोदींचा हा प्रस्ताव 11 डिसेंबर 2014 रोजी स्वीकारत अवघ्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करण्याची घोषणा केली. यानंतर 21 जून 2015 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. बुधवार, 21 जून 2023 रोजी नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला.
जीवनातील योगाचे संभाव्य फायदे
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी लोकांना जागरुक करणे हा योग दिनाचा उद्देश आहे. सद्यस्थितीत खासगी आणि सार्वजनिक जीवनात योगाचा प्रचार सुरू आहे. आजच्या जगात केवळ वृद्धच नाही तर तऊणांनाही अनेक आजार होत आहेत. लोकांना विविध आजारांपासून वाचवण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी त्याचा पुढाकार घेण्यात आला होता. योगामुळे कोणतीही व्यक्ती केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही निरोगी राहते.