पंतप्रधानांच्या उपस्थितीत मानवंदना : भारतीय समुदायाचीही उपस्थिती
वृत्तसंस्था/ काहिरा
तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी इजिप्तची राजधानी काहिरा येथे पोहोचले. पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी भारतीय समुदायातील अनेक सदस्य उपस्थित होते. इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मँडबोली यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींचा हा दोन दिवसांचा इजिप्त दौरा असून ते इजिप्तच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचीही भेट घेऊन चर्चा करतील.
पंतप्रधान मोदी 24 व 25 जून असे दोन दिवस इजिप्तमध्ये काढून मायदेशी परतणार आहेत. त्यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा असून त्यांचे इजिप्त पंतप्रधानांशी पहिल्यांदाच गोलमेज बैठक होत आहे. जानेवारी 2023 मध्ये राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या भारताच्या यशस्वी भेटीनंतर दोन्ही देशांनी धोरणात्मक भागिदारीमध्ये संबंध वाढवण्यास सहमती दर्शविली. इजिप्त राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान इजिप्तला भेट देत आहेत. हे आमंत्रण जानेवारी 2023 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना देण्यात आले होते.
भारतीय समुदायाशी संवाद
पंतप्रधान इजिप्त सरकारमधील वरिष्ठ मान्यवर आणि काही प्रमुख व्यक्तींसह भारतीय समुदायाशी स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत. भारत आणि इजिप्तमधील संबंध प्राचीन व्यापार आणि आर्थिक संबंधांवर तसेच सांस्कृतिक आणि खोलवर ऊजलेल्या लोक-लोकांच्या संबंधांवर आधारित आहेत.
अल-हकीम मशिदीला भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या पहिल्या भेटीत 11व्या शतकातील अल-हकीम मशिदीलाही भेट देणार आहेत. रविवारी दुपारी एकच्या सुमारास ते मशिदीत जातील. त्यानंतर दुपारी 2 वाजता ते हेलिओपोलिस हुतात्मा स्मारकाला भेट देतील आणि पहिल्या महायुद्धात इजिप्तसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्र्रद्धांजली अर्पण करतील. पहिल्या महायुद्धात इजिप्तमधील विविध लढायांमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या 3,799 सैनिकांचे हे स्मारक आहे.
हेलिओपोलिस हुतात्मा स्मारकाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फताह अल-सिसी यांची इजिप्शयिन प्रेसीडेंसी येथे भेट घेतील. यानंतर दोन्ही नेते सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून संध्याकाळी 5.30 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान मोदी नवी दिल्लीला रवाना होतील.