भारतात अनेक पंथ अनेक धर्म बघायला मिळतात. ज्याचा त्याचा देव वेगळा, पूजेची पद्धत वेगळी, गंध लावण्याची पद्धत वेगळी, कोणी उभे पट्टे लावणार तर कोणी आडवे पट्टे लावणार, कोणी गळय़ात जानवे घालणार तर कोणी हातात दोरे बांधणार. जसा भाव तसा देव. खरंतर तो सर्वत्र एकच असतो पण फक्त वेगवेगळय़ा रुपात प्रकट होत असतो. हेच तत्व सांगणारे हे मंदिर जरी विष्णुचे असले तरी त्याची पूजा करणारे शिवभक्त, केरळमधील नंबुद्रीपाद समाजाचे पुजारी यांना दंडी संन्यासी म्हणतात. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतात. दंड धारण करून काशाय वस्त्र धारण करताना, ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी, तो संसार बंधनातून मुक्त असलेला हवा. अशी बारा वर्षे झाली की हे संन्यासी परमहंस पदाला प्राप्त होतात. देवपूजेबरोबर शिष्य घडवताना हे संन्यासी आचार्यपदी आधीच पोहचलेले असतात. गढवाल रायफल्स- भारतीय सेनेतील गढवाल रायफल्स म्हणजे शौर्य आणि सन्मानाचे नाव. या सेनेतील प्रत्येकाला ‘हाई होलीनेस’ ही पदवी विशिष्ट सेवा मेडल देण्याची प्रथा याच भागातली. ज्याला राजघराण्यापेक्षाही मोठा मान असतो.
समितीवरचे अधिकारी- मंदिर अस्तित्वात आले त्या वेळेस त्रावणकोरचे राजेच सर्वेसर्वा होते. परंतू ब्रिटीश काळात जेंव्हा गढवालचे विभाजन झाले, त्यावेळेस राज्य अधिनियम कायदा अंमलात आला आणि 17 सदस्यीय समिती बनली. त्यात सरकारी अधिकारी, उपाध्यक्ष, संसदेचे विधायक, त्याचबरोबर गढवाल, टिहरी, चमोली व उत्तर काशी या ठिकाणचे सर्व जिह्याचे जिल्हा परिषद सदस्यही असतात.
दर्शनाचे उत्सव….बद्रीनाथाचे दर्शन घ्यायला तिथपर्यंत पोहचणंच कठीण, कोणी काठीचा आधार घेत चालतात तर कोणी पालखी, घोडे वापरतात. तोंडाने मात्र भगवंताचा जयघोष सुरू असतोच. कित्येकांना समजतच नाही, आपण येथवर कसे आलो ते. तुमच्याबरोबर चैतन्य शक्ती बनून तोच चालत असतो. तुमच्या मनात फक्त जबरदस्त इच्छा हवी. इथे नद्यांच्या संगमावर भक्तीचे झरे येऊन मिसळतात. देवाचं दर्शन आणि धार्मिक परंपरा, यात्रेनिमित्त येण्यासाठीच अखंड सुरू असतात. बद्रीनाथाला सतत अभिषेक करणाऱया जलराशी, आरतीसाठी सज्ज झालेली सूर्याची निरांजने आणि भक्तीचा सुगंध पसरवत निघालेले थंडगार वारे म्हणजे नवविधा भक्तीचा संगम दिसतो. अशातच वेदपठण, विष्णुसहस्त्रनाम सुरू होऊन देवाची षोडशोपचारे पूजा सुरू होते. अभिषेक, गीतापाठ आणि संध्याकाळी गीत गोविंद म्हणताना मूर्तीला चंदन लेपन करतात, तेच चंदन दुसऱया दिवशी भक्तांना प्रसाद म्हणून देतात. चंदनाला आता स्वतःबरोबर विष्णुंचे सान्निध्य मिळाल्याने एक स्वर्गीय सुगंध आसमंतात भरून राहतो.