वृत्तसंस्था/ पॅरिस ( फ्रान्स)
रविवारपासून येथे 2023 च्या टेनिस हंगामातील दुसऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ झाला. सदर स्पर्धा रेड क्लेकोर्टवर खेळविली जात आहे. महिला एकेरी बेलारुसच्या आर्यना साबालेंकाने विजयी सलामी देताना युक्रेनच्या कोस्ट्युकचा पराभव केला.
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असल्याने युक्रेनच्या खेळाडूबाबत नेहमीच तिरस्काराची भावना विविध स्पर्धांमध्ये व्यक्त केली जाते, याला फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा अपवाद ठरली नाही. साबालेंकाने पहिल्या फेरीतील सामन्यात कोस्ट्युकचा 6-3, 6-2 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. या युद्धाला बेलारुसचा पाठिंबा असल्यामुळे सामना संपल्यानंतर कोस्ट्युकने साबालेंकाशी औपचारीक हस्तांदोलन करण्याचे टाळत तिने आपल्या खुर्चीकडे मार्गक्रमण केले. हा सामना सुरु असताना शौकिनांकडून बेलारुस देशाविरुद्ध विरोधी घोषणा दिल्या गेल्या. साबालेंका सध्या महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.