महाबळेश्वर, प्रतिनिधी
Satara News : महाबळेश्वर वनविभागाने सोमवारी सायंकाळी धाडसी कारवाई करून व्हेल माश्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.माचुतर गावच्या हद्दीत चार तस्करांना सापळा रचून शिताफीने अटक केली. या चौघांकडून करोडो रुपयांची व्हेल माशाची उलटी व तस्करीसाठी वापरलेले वाहन वनविभागाने जप्त केले या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्राचे तस्करी कनेक्शन उघडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे वनक्षेत्रपाल गणेश महांगडे यांचे सर्वस्तरावून कौतुक होत आहे.
महाबळेश्वर मेढा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वर वनपरिक्षेत्रातील माचुतर येथे व्हेलमाशाची उलटीची विक्री करताना अनिल अर्जुन ओंबळे,रा बोंडारवाडी,ता महाबळेश्वर (वय -४३),संतोष खुशालचंद्र जैन,रा निसर्ग विहार,रत्नागीरी (वय-५३),प्रकाश पाटील ,संजय जयराम सुर्वे,रा नृसिंह मंदिराजवळ,मेढा ता. जावली (वय-५५) यांना वनविभागाने सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. तब्बल साडेसहा किलोग्रॅम व्हेल माश्याची उलटी,वजनकाटा व एक वाहन जप्त करण्यात आले असून या व्हेल माश्याच्या उलटीची किंमत करोडो मध्ये असल्याची शक्यता आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,वनविभागास दिल्ली येथून खबऱ्या मार्फत दोन तीन दिवस आधीच व्हेल माशाच्या उलटीची विक्रीसाठी लोक येणार असल्याची माहिती मिळाली होती. यासंदर्भात वनविभागाने आपल्या स्थानिक खबऱ्यांना सतर्क केले होते. सोमवारी सकाळी स्थानिक खबऱ्यांकडून रत्नागिरी येथून एक व्यक्ती व्हेल माश्याची उलटी घेऊन एसटीने महाबळेश्वर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. महाबळेश्वर -मेढा रस्त्यावरून एका वाहनामध्ये चौघे निघाले असता अधीच वन विभागाने सापळा रचून माचुतर गावाच्या हद्दीमध्ये सोमवारी सायंकाळी दुपारी ५.३० वाजण्याच्या सुमारास या चौघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे फ्लोटिंग गोल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटी जप्त करण्यात आली. तसेच वापरण्यात आलेले एक वाहन व वजनकाटा देखील ताब्यात घेण्यात आला.सोमवारी रात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या कार्यालयात जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते. या चौघांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.आज त्यांना वाई येथिल न्यायालयात हजर करण्यात आले.
या कारवाईमध्ये महाबळेश्वर सातारा व मेढा वनविभागाने सहभाग घेतला उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज सहा वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने पदभार स्वीकारलेले वनक्षेत्रपाल गणेश उत्तमराव महांगडे यांच्यासह वनविभागाच्या अधिकारी,कर्मचारी यांनी महत्वाची भूमीका बजावली आहे