राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले? , असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, जर तुम्ही माजी पोलीस आयुक्तांचं पत्र पाहिलं, तर त्यांनी त्यात फेब्रुवारीच्या मध्याचा उल्लेख केला आहे. या काळात सचिन वाझेंना गृहमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी परमबीर सिंग यांना दिल्याचं ते म्हणतात. पण ६ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यामुले हे स्पष्ट होत आहे की ज्या कालावधीसंदर्भात आरोप केले जात आहेत, त्या काळात अनिल देशमुख रुग्णालयात होते. त्यामुळे राजीनाम्याच्या मागण्यांना काहीही आधार उरत नाही, असं पवार म्हणाले.