बाबर गँगविरोधी लवकरच मोका या मथळ्याखाली फक्त ‘दै. तरुण भारत’ ने तीन दिवसांपूर्वी केले होते वृत्त प्रसिद्ध
इचलकरंजी / राजेंद्र होळकर
इचलकरंजी शहरातील नामचीन एसबी उर्फ सुदर्शन बाबर याच्या गँगवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोका) केलेल्या कारवाईच्या प्रस्तावाला बुधवारी दुपारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी स्वाक्षरी करीत मंजुरी दिली. बाबर गॅंग विरोधात लवकरच मोका या मथळ्याखाली फक्त ‘दै.तरुण भारत’ ने रविवारी (१४ नोव्हेंबर) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी बाबर गॅंगविरोधात मोकाच्या केलेल्या कारवाईनंतर ‘तरुण भारत’ च्या वृत्ताची शहरातील गुन्हेगारी जगतात चर्चा केली जात आहे.
गुंड एस. बी. उर्फ सुदर्शन बाबर विरुद्ध जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, गर्दी मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. याची दखल घेऊन तत्कालीन इचलकरंजीचे अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे आणि जयसिंगपुरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षण सीताराम डुबल यांनी मोक्कानंतर्गत कारवाई केली. या गुन्ह्यातून तो काही महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने शहरातील जवाहर नगरातील संतोष उर्फ पप्पू जाधव या युवकाचा गेल्या महिन्यात भररस्त्यात निर्घृणपणे खून केल्याचे पोलिसात निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी आणि त्यांच्या पथकाने त्याचा शोध घेऊन गडहिंग्लज परिसरातून जेरबंद केले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आदी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गुंड बाबर विरुद्ध दाखल गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत या गॅंगवर मोक्कातंर्गत कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानंतर पोलीस उपअधीक्षक महामुनी आणि त्यांच्या पथकाने गुंड बाबर आणि त्याच्या आठ साथीदाराविरुद्ध मोक्कातंर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव छाननीकरिता अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या कार्यालयाकडे पाठवला. त्यांनी या प्रस्तावाची छाननी करुन, पुढील कारवाईसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला. सोमवारी पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी या प्रस्तावाची छाननी करून, अंतिम मंजूरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवला. विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी या प्रस्तावाची छाननी करत त्याला बुधवारी दुपारी मंजुरी दिली. या मंजुरीने व ‘तरुण भारत’ ने रविवारी प्रसिध्द केलेल्या बाबर गँगला लवकरच मोक्का या मथळ्याखालील वृत्ताची पोलीस दलाबरोबर गुन्हेगारी एकच चर्चा केली जात आहे.