विदेशातील पाच कंपन्यांकडून गुंतवणुकीचा प्रस्ताव : वेगाने वाढणार सेमीकंडक्टर मार्केट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात इलेक्ट्रॉनिक चिप आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट उभारण्यासाठी विदेशातील पाच मोठय़ा कंपन्यांनी सरकारला गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव 20.5 अब्ज डॉलर्सचा (1.53 लाख कोटी रुपये) असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सरकारने हे प्रस्ताव स्विकारल्यास देशातील ऑटो सेक्टरमध्ये सध्या प्रामुख्याने जाणवणारे चिपचे संकट नजिकच्या काळात दूर होण्याचे संकेत मिळत आहेत.
वेदांता फॉक्सकॉन जेव्ही, आयजीएसएस वेंचर्स आणि आयएसएमसी या कंपन्यांनी सरकारकडे 13.6 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसह इलेक्ट्रॉनिक चिप उत्पादन युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासोबतच या कंपन्यांनी सेमीकंडक्टर उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘सेमिकॉन इंडिया प्रोग्राम’ अंतर्गत केंद्र सरकारकडे 5.6 अब्ज डॉलर्सची मदतही मागितली आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगच्या या ग्रीनफिल्ड सेगमेंटमध्ये सरकारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. वेदांत आणि एलेस्ट या दोन कंपन्यांनी अंदाजे 6.7 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीसह डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या कंपन्यांच्या प्रस्तावांबाबत तातडीने निर्णय झाल्यास देशातील वेगाने सेमीकंडक्टर मार्केटला गती येऊ शकते.