पैशाची तरतूद न झाल्याने पथक आलेच नाही
प्रतिनिधी /मडगाव
कोलवा येथे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून उभारलेल्या सिल्व्हर सँड हॉटेल पाडण्याचा आदेश देण्यात आला असला तरी काल हे बांधकाम पाडण्यासाठी यंत्रसामूग्री लागते, त्यासाठी पैशांची तरतूद न केल्याने तुर्त या हॉटेलवरील कारवाई लांबणीवर पडली आहे.
हे हॉटेल पाडण्यासाठी काल मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा कोलव्यात तैनात करण्यात आला होता. पण, पैशांची तरतूद केली नसल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने आपले पथक पाठविलेच नाही. आत्ता पैशांची तरतूद केल्यानंतरच पुन्हा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिल्व्हर सँड हॉटेलच्या बांधकामाच्या विरोधात कोलवा नागरी मंचच्या ज्यूडीत आल्मेदा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने हे बांधकाम पाडून टाकण्याचा आदेश दिला होता. त्या प्रमाणे ही कारवाई होणार होती.
हॉटेलवर कारवाई करण्यासाठी वीज खात्याचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र कारवाईसाठी जी यंत्रसामुग्री वापरली जाणार होती, त्यासाठी पैशांची तरतूद करण्यात न आल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने आपले पथक पाठविलेच नाही. त्यामुळे कारवाई लांबणीवर पडली आहे.