अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 2 फेब्रुवारी 2022, सकाळी 11.45
●519 बाधित
● पॉझिटिव्हीटी रेट 11.89 टक्के
● विवाह सोहळय़ांना दोनशेच्या उपस्थितीची मर्यादा
● आठवडा बाजारांना परवानगी
● पर्यटनस्थळे खुली
प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हय़ात कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कोविडचे निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. गेल्या आठवडय़ात एक हजाराच्या आसपास असणारे रूग्ण प्रमाण पाचशेवर आले असून पॉझिटिव्हीटी रेटमध्ये निम्म्याने घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल केल्याने जनजीवन आणखी सुरळीत होणार आहे.
519 नवे रूग्ण
मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात 4366 नमुने तपासण्यात आले आहेत. यात 519 रूग्ण बाधित आले असून पॉझिटिव्हीटी रेट 11.89 टक्के इतका आहे. सातारा व कराड तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये रूग्णांचे प्रमाण कमी आहे.
अंत्यसंस्कारांना उपस्थितीची मर्यादा नाही
प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी मंगळवारी सायंकाळी निर्बंध शिथिलतेचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उद्याने आणि सफारी नियमित तसेच ऑनलाइन तिकीट बुकिंग घेऊन वेळेनुसार खुले राहतील. जिह्यातील प्रेक्षणीय स्थळे नियमित तसेच ऑनलाइन तिकीट बुकिंग घेऊन वेळेनुसार खुली राहतील. जिल्ह्यात ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा असणार नाही. सर्व उद्याने व बागा खुल्या ठेवण्यास परवानगी राहील. करमणूक व थीम पार्क 50 टक्के क्षमतेसह कार्यरत राहतील. जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने खुली राहतील.
विवाह सोहळय़ांना 200 लोकांची उपस्थिती
भजने आणि इतर सर्व स्थानिक सांस्कृतिक आणि लोक करमणुकीचे कार्यक्रम हॉल ठिकाणच्या 50 टक्के क्षमतेसह आयोजन करण्यास परवानगी राहील. विवाह समारंभाच्या बाबतीत बंदिस्त व खुल्या जागेच्या ठिकाणी उपस्थितांची संख्या 200 किंवा जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के पर्यंत यापैकी जे कमी असेल तेवढय़ा लोकांना विवाह समारंभास उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
आठवडा बाजारांना परवानगी
स्थानिक पर्यटन स्थळे खूली करण्याबाबत तेथील कोविड परिस्थितीचा विचार करून संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी निर्णय घ्यावा. 11-25 टक्केपर्यंत प्रेक्षकांसह स्पर्धात्मक खेळ व त्याअनुषंगाने इतर क्रीडांना परवानगी असेल. आठवडा बाजार चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. जिह्यात व्यक्तींच्या हालचाली रात्री अकरा ते सकाळी पाच या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई असेल. रेस्टॉरंट्स, सिनेमागृह नाटय़गृह 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी राहील.
बुधवारी जिल्हय़ात
एकूण नमुने 4366
एकूण बाधित 519
बुधवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने25,06,603
एकूण बाधित 2,76,881
एकूण मृत्यू 6574
मुक्त 259806