तापसी पन्नू ही बॉलिवूडमधली उंचपुरी आणि आकर्षक अभिनेत्री. तिचा फिटनेस लगेच लक्षात येतो. ‘नाम शबाना’, ‘पिंक’, ‘मुल्क’ अशा विविध चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तापसीच्या सुडौल बांध्याची बरीच गुपितं आहेत. तिला विविध खेळ खेळायला आवडतात. त्यातही स्क्वॅश हा तिचा आवडीचा खेळ आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी ती स्क्वॅश खेळते. जीममध्ये जाण्याऐवजी ती स्क्वॅश खेळण्याला प्राधान्य देते. तापसी साधारण अर्धा तास स्क्वॅश खेळते. ती प्रत्येक चित्रपटासाठी वेगळी तयारी करते. ‘पिंक’मधल्या
भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती. तिने जीममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं होतं.
तापसी डाएटवर फार भर देत नाही. ती कोणत्याही ठराविक डाएटचा अवलंब करत नाही. तापसी विविध पोषक घटकांचा आहारात समावेश करते. ती साखर तसंच मैद्याचे पदार्थ टाळते. घरच्या अन्नावर तिचा भर असतो. सकाळी उठल्यावर ती पेलाभर गरम पाणी पिते. यानंतर ती फळांचा किंवा भाज्यांचा रस पिते. ती थोडय़ा थोडय़ा वेळाने थोडं थोडं अन्न खाते. भूक मारण्यापेक्षा एकावेळी थोडं खावं असं ती सांगते. तापसी रात्रीचं जेवण आठ वाजेपर्यंत घेते. कधी उशीर झाला तर जेवणाऐवजी सूप आणि सॅलड असा आहार घेते.