सर्वपक्षीय, व्यापाऱयांच्या बैठकीत निर्णय
7 ते 15 मे पर्यंत लॉकडाऊन
अधिकृत नियमावली आज करणार जाहीर
वार्ताहर / दोडामार्ग:
संपूर्ण दोडामार्ग शहरासह तालुक्यात 7 ते 15 मे पर्यंत नऊ दिवसांचा कडक लॉकडाऊन मंगळवारी जाहीर झाला आहे. दोडामार्ग शहरातील सर्व व्यापारी नागरिक यांच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. दरम्यान, बुधवारी तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व सरपंच, सर्वपक्षीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यात आजचा निर्णय व निययामावली अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे.
येथील तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दोडामार्ग शहरवासीयांची खास बैठक आयोजित झाली होती. या बैठकीला पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, दोडामार्ग मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर, सेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, व्यापारी प्रशांत नाईक, श्याम चांदेलकर, मोहन गवंडे, सागर शिरसाट आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकाऱयांसोबत नानचे तसेच अन्य व्यापाऱयांनी सविस्तर चर्चा केली. दोडामार्ग शहरात नेमके किती सक्रिय कोरोना रुग्ण आहेत? तसेच शहर परिसरात नेमकी काय परिस्थिती आहे? व त्याबाबत आपल्याकडे काय माहिती आहे? असे नानचे यांनी विचारले असता शहरातील कोरोनाचे सक्रिय रुग्ण त्यांची माहिती मिळण्यास काहीसा विलंब होत असून तरीही नगरपंचायत प्रशासन त्यावर लक्ष ठेऊन आहे, असे गायकवाड म्हणाले. तेव्हा मुळात जर रुग्णाची संख्याच अधिकृत मिळत नसेल तर मग उपाययोजना कशा करणार? तसेच प्रत्येक वेळी शहरातील व्यापाऱयांना वेठीस धरुन उपयोग काय? असाही मुद्दा नानचे यांनी मांडला. शहरातील सक्रिय कोरोना रुग्णाचा नीट अभ्यास करा व नीट माहिती द्या. त्यावर आरोग्य विभागाच्या संपर्कात रहा, असे नानचे यांनी सुचविले. त्यांनतर सर्व व्यापाऱयांनी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार खानोलकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी देखील कोरोनाशी लढू पाहणाऱया आरोग्य यंत्रणेमधील व प्रशासनातील अनेक त्रुटींकडे बोट दाखविण्यात आले. दोडामार्ग शहर तसेच अन्य ठिकाणी टेस्ट केलेल्या रुग्णाचे रिपोर्टस मिळण्यास काहीसा विलंब होत असून यामुळे प्रशासन व नागरिक यांच्यात काहीसा विसंवाद निर्माण झाला आहे. ज्या भागातील लोकांनी टेस्ट केल्या. त्यांचे अहवाल तातडीने मिळत राहिल्यास केल्या जाणाऱया उपाययोजनांना गती मिळू शकेल. याकडे या बैठकीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. दोडामार्ग – गोवा सीमेवर तसेच अन्य संबंधित ठिकाणी शिक्षण, आरोग्य, महसूल, कृषी, ग्रा. पं. आदी विभागातील जे कर्मचारी तैनात आहेत, त्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेसाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत. अलीकडेच दोन शिक्षक ऑनडय़ुटी असताना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. ते पाहता वरील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांसोबत पोलिसांनाही आवश्यक उपयोयोजना सामग्री द्या, अशी मागणी नानचे यांनी केली. तर कोरोना टेस्ट झाल्यानंतर अनेक रुग्ण इतरत्र फिरतात. त्यांच्यामुळे आणखी फैलाव होऊ शकतो. ते पाहता अशा रुग्णांच्या हातावर क्वांरटाईनचे शिक्के मारावेत, अशी मागणी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केली. दरम्यान, दोडामार्गातील शेतकऱयांना गोव्यातील दूध डेअरीवर ग्रा. पं व न. पं चा दाखल लागेल. तसेच पर्यायी वाटा देखील बंद करण्यात येणार असून अन्य अधिकृत नियमावली उद्या बुधवारी जाहीर करण्यात येईल, असे तहसीलदार खानोलकर यांनी सांगितले.
पोलीस कारवाईबद्दल तीव्र नाराजी
दोडामार्ग बाजारपेठेतील व्यापारी, नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शासकीय नियमावलीप्रमाणे सकाळी 11 वाजेपर्यंत नीट व्यवसाय करत असताना आज मंगळवारी सकाळी 9 ते 9.15 वा. सुमारास दोडामार्ग पोलिसांनी अचानकपणे गांधी चौकात येऊन लोकांना हुसकावण्याची कार्यवाही केली. याबबद्दल नानचे यांनी पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. .