निलजी गावाने जपला वेगळा वसा
प्रतिनिधी/ बेळगाव
निलजी गाव धार्मिक आणि आनंदाने उत्सव साजरे करणारे म्हणून ओळखले जाते. या गावातील मंदिरे असोत किंवा भक्तीने जाणाऱया पंढरपूर, श्री रेणुका देवी उत्सवाच्या ठिकाणी राहण्याची सोय करणारे हे पहिले गाव आहे. पंढरपूरसारख्या ठिकाणी जमीन घेवून त्या ठिकाणी निवासी संकुल उभे केले. त्या निवासी संकुलावर आणखी एक मजला बांधण्यात आला असून त्याचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला आहे.
पंढरपूर येथे श्रीराम मंदिर ट्रस्ट, श्रीराम सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळ व समस्त निलजी ग्रामस्थांच्यावतीने हे निवासी संकुल उभे करण्यात आले आहे. या स्लॅब भरणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाराम भरमा मोदगेकर होते. ह.भ.प. सिद्राय गोपाळ पाटील यांच्या हस्ते स्लॅब भरणी करण्यात आली. या परिसरात असलेल्या श्रीराम, सीता व लक्ष्मण तसेच हनुमान यांच्या मूर्तीचे पूजन ह.भ.प. मल्लाप्पा नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
वैकुंठवासी बाळाराम महाराज यांच्या पादुकांचे पूजन ह.भ.प. खाचू निंगाप्पा पाटील, काँक्रिट मशिनचे पूजन ह.भ.प. बसवंत भरमा शिंदोळकर, भरमा निंगानी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्राम पंचायत सदस्य भरमा गोमाणाचे, मधू पाटील होते. सूत्रसंचालन ऍड. लक्ष्मण पाटील यांनी केले. गोविंद यल्लाप्पा मोदगेकर यांनी आभार मानले.
यावेळी कृष्णा सांबरेकर, विष्णू बसवंत पाटील, बळवंत देसाई, आप्पाजी अक्षीमनी, बंडू पाटील, भावकाण्णा हंचिनमनी, परशराम पाटील, रामा धनवाडे यांच्यासह भाविक उपस्थित होते.