क्लोजडाऊनमध्ये काम पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पांगुळ गल्ली-भोई गल्ली कॉर्नर येथे मागील काही दिवसांपासून रस्ता उखडून ठेवण्यात आला आहे. याला दोन महिने उलटले तरी, अद्याप हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. यामुळे पांगुळ गल्ली, भेंडीबाजार, मेणसी गल्ली परिसरात खरेदीसाठी येणारे ग्राहक व्यापारी यांना त्रास सहन करावा लागत असल्याने क्लोजडाऊनमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दोन वर्षांपूर्वी पांगुळ गल्ली रस्त्याचे रूंदीकरण केले होते. त्यावेळी पांगुळ गल्ली-भेंडीबाजार कॉर्नरला गटारीचे बांधकाम करण्यात आले. परंतु त्यावेळी त्याची उंची वाढविण्यात आल्याने पावसाचे पाणी पांगुळ गल्ली व भोई गल्लीच्या घरे व दुकानांमध्ये शिरले. यामुळे रस्ता व गटारीवर घालण्यात आलेल्या कॉंक्रिटची उंची कमी करण्याची मागणी रहिवाशांमधून करण्यात आली. याचा स्थानिक रहिवाशांनी वारंवार पाठपुरावा
केला.
दोन महिन्यांपूर्वी भेंडीबाजार कॉर्नरपासून ते जैन मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण उखडण्यात आले आहे.
रस्त्याची उंची कमी करून त्याठिकाणी डांबरी रस्ता करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाल्याने हे काम सध्या ठप्प आहे. क्लोजडाऊन सुरू असल्याने बाजारातील गर्दी कमी आहे. त्यामुळे या काळात हे काम पूर्ण केल्यास व्यापारी तसेच रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या कामाला सुरुवात करण्याची मागणी करण्यात येत आहे.