ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील रुग्ण संख्या आणि मृत्यूची संख्येत वाढ सुरु आहे. अशातच काल महाराष्ट्रातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
मागील 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गुरुवारी राज्यात 62 हजार 919 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 69 हजार 710 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गुरुवारी ही संख्या 68 हजार 537 इतकी होती. तर निदान झालेल्या रुग्णांची संख्या 66 हजार 159 इतकी होती. गुरुवारच्या तुलनेत काल घट झाली असून हा फरक 3 हजार 240 इतका आहे.
दरम्यान, कालच्या दिवशी 828 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 46 लाख 02 हजार 472 वर पोहचली आहे. यातील 38 लाख 68 हजार 976 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 68 हजार 813 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.6 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.5 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 62 हजार 640 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 71 लाख 06 हजार 282 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46 लाख 02 हजार 472 (17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41 लाख 93 हजार 683 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 26 हजार 462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 62 हजार 640 इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढली असून येथे राज्यात सर्वाधिक 1 लाख 06 हजार 019 इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा 65 हजार 670 इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या 50 हजार 474 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या 78 हजार 614 इतकी झाली आहे. आणि नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजार 548 इतकी आहे.