वृत्तसंस्था/ बेलग्रेड
आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेच्या पुरूषांच्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी भारतीय मुष्टियुद्ध संघ सज्ज झाला आहे. सदर स्पर्धेमध्ये 105 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी होत आहेत.
2019 विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचा टॉप सीडेड मुष्टियोद्धा अमीत पांघलने रौप्यपदक तर मनिष कौशिकने कांस्यपदक मिळविले होते. या स्पर्धेत भारताला केवळ दोन पदकावर समाधान मानावे लागले होते.
सोमवारपासून सुरू होणाऱया या स्पर्धेत अधिक पदके मिळविण्यासाठी भारतीय मुष्टियोद्धय़ांनी जोरदार सराव यापूर्वी केला आहे. भारतीय मुष्टियुद्ध संघामध्ये आशिया स्पर्धेतील पदक विजेते दीपक कुमार, शिवा थापा आणि संजित यांचा समावेश आहे. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये होणारी ही स्पर्धा 13 विविध वजन गटामध्ये खेळविली जाणार आहे. 48, 51, 54, 57, 60, 63.5, 67, 71, 75, 80, 86, 92 आणि 92 किलोवरील वजनगटात लढती होतील. प्रत्येक गटातील सुवर्णपदक विजेत्याला एक लाख डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 50 हजार डॉलर्स आणि दोन्ही कास्यपदक विजेत्यांना प्रत्येकी 25 हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे.
भारतीय मुष्टियुद्ध संघ- गोविंद सहानी (48 कि.), दीपक कुमार (54 कि), आकाश (57 कि.), रोहित मोर (57 कि.), वरिंदर सिंग (60 कि), शिवा थापा (63.5 कि), आकाश (67 कि), निशांत देव (71 कि,), सुमीत (75 कि.), सचिन कुमार (80 कि), लक्ष (86 कि), संजित (92 कि.), नरिंदर (92 किलोवरील).